छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गास लवकरच मंजुरी मिळेल; नितीन गडकरींची माहिती
By विकास राऊत | Updated: October 14, 2023 19:18 IST2023-10-14T19:18:20+5:302023-10-14T19:18:48+5:30
लोकमत इफेक्ट: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीएमआयएच्या शिष्टमंडळाला दिली माहिती

छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गास लवकरच मंजुरी मिळेल; नितीन गडकरींची माहिती
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर व्हाया पैठण ते पुणे या नवीन (एक्स्प्रेस-वे) द्रुतगती महामार्गाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर येणार असून, त्यास मंजुरी मिळेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी येथे दिली.
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शुक्रवारी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री गडकरी यांची विमानतळावर भेट घेऊन लोकमतमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या कात्रणासह निवेदन दिले. भेटीअंती त्यांनी शिष्टमंडळाला या महामार्गाचा डीपीआर तयार झाल्याचे सांगितले. तसेच ऑगस्टमध्ये भारतमाला टप्पा-२ मध्ये ग्रीनफिल्डमध्ये हा महामार्ग प्रस्तावित आहे. कॅबिनेटपूर्वीदेखील या महामार्गाचा निर्णय होऊ शकतो, असेही त्यांनी सीएमआयएला सांगितले. डीपीआरला मान्यता मिळताच पुढील काम वेगाने होईल. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील, सचिव उत्सव माछर यांच्यासह एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अधिसूचना निघून दहा महिने
या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) निघून १० महिने झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन, तर पैठण तालुक्यातील पैठण (बायपास) वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रुक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून हा मार्ग जाणार आहे.
निवेदनात काय म्हटले आहे?
शेंद्रा ते चिकलठाणा मार्गे वाळूजपर्यंत डबल डेकर उड्डाणपूल व मेट्रोचा प्रस्ताव प्रलंबित आहे. ऑरिक शेंद्रा ते बिडकीन हायवेचा प्रस्ताव मागे पडला आहे. जालना रोडविना या उद्योगांसह इतर वाहतुकीला पर्याय नाही. छत्रपती संभाजीननगर ते पुणे ग्रीनफिल्ड एक्सप्रेस - वे प्रकल्पाची घोषणा झाली. मात्र, पुढे काही झालेले नाही. औट्रम घाटाचे काम प्रलंबित आहे.
काय म्हणाले होते गडकरी?
१० ते १२ हजार कोटींचा हा महामार्ग असून, पुढच्या दाैऱ्यात या मार्गाचे भूमिपूजन करण्यासाठी मी येईन. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे २२५ कि. मी. अंतर दोन तासांत पूर्ण करता येईल. त्यासाठी बीड ते अहमदनगर ते पैठणमार्गे अलायमेंट अंतिम झाले आहे.
-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (२४ एप्रिल २०२२, बीड बायपास येथील सभेत)