छत्रपती संभाजीनगर : वर्गातील आंतरधर्मीय तरुणीशी मैत्री केल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्यास टोळक्याने बेदम मारहाण करीत बीड बायपासवरून शनिवारी अपहरण केले हाेते. या प्रकरणात गुन्हा नोंदविल्यानंतर मारहाण करणाऱ्या टोळक्यातील अनास अकबर जलालुद्दीन शेख (२१, रा. बारी कॉलनी) यास अटक केल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांनी दिली. या आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
फिर्यादी पार्थ संदीप सोनावळे (रा. सिडको वाळूज महानगर) याच्या तक्रारीनुसार, तो शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे द्वितीय वर्षात शिक्षण घेतो. त्याच महाविद्यालयात तिसऱ्या वर्षामध्ये शिकणारे दोन जण कॉलेजमध्ये आणि बाहेर नेहमी त्याचा पाठलाग करीत होते. शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास तो आणि मित्र प्रथमेश साळवे हे घराकडे निघाले. दोन्ही आरोपी पाठलाग करत असल्याने त्यांनी दुसऱ्या मार्गाने जाण्याचे ठरविले. बीड बायपासवरील सवेरा हॉटेलजवळ तिघांनी त्याची दुचाकी अडविली. तसेच दहा ते पंधरा जणांचे टोळकेदेखील तिथे दाखल झाले. सर्वानी पार्थला बेदम मारहाण सुरू केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने काळ्या रंगाच्या मोठ्या गाडीमध्ये बसवून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. तिथे एक तास त्याला मारहाण केली.
दरम्यान, एक जणाने पोलिसांना अपहरण केल्याचे समजले असून, त्याला सोडून आपल्याला पळावे लागेल. नाहीतर आपण पकडले जाऊ, असे म्हटले. त्यानंतर पार्थला रेल्वेस्टेशन ब्रिजजवळ, हमालवाडा येथे सोडून टोळके पसार झाले. पार्थने घाबरून तेथून पळत बालाजी स्वीट मार्ट गाठले. आईला फोन केला. तेवढ्यात त्याचे मामा सुरेश बाहुले पोलिसांना घेऊन आले. त्यानंतर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्रीच सातारा पोलिसांनी घटनेतील अनासला अटक केली. तर आणखी पंधरा आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करीत आहेत.