छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पावसाच्या रिमझिम सरी कोसळत होत्या. रविवारी शहरात मात्र जोरदार पाऊस झाला. चिकलठाणा, मुकुंदवाडी आदी भागात अतिवृष्टी झाली. चिकलठाणा वेधशाळेने ७९.४ मिमी पावसाची नोंद केली. उर्वरित शहरात जोरदार पाऊस झाला. जुना मोंढा भागातील रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहक व व्यापाऱ्यांची एकच त्रेधा उडाली. चिखलातच बाजार भरला होता.
वेधशाळेने दोन दिवसांपूर्वीच पुढील काही दिवस जोरदार पाऊस होणार असा अंदाज वर्तविला होता. रविवारी तो खराही ठरला. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास आभाळ भरून आले. विजांचा कडकडाट सुरू झाला. १.३० वाजेच्या सुमारास पावसाच्या सरी सुरू झाल्या. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहर आणि परिसरात पावसाचा जोर अर्धा तास चांगला होता. चिकलठाणा, मुकुंदवाडी आदी भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे वेधशाळेने सायंकाळी ७९.४ मिमी पावसाची नोंद केली.एमजीएम विद्यापीठाच्या परिसरात १२.२ मि.मी. तर एमजीएम स्कूल पडेगाव येथील केंद्राने ११.२ मि.मी पावसाची नोंद घेतली. पुढील ६ दिवस दररोज पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
दोन ठिकाणी झाडे, फांद्या पडल्यारोकडा हनुमान कॉलनीतील सावजी हॉस्पिटलजवळ एका झाडाची फांदी कोसळली. अग्निशमन विभागाने धाव घेऊन फांदी दूर केली. त्याचप्रमाणे जयभवानीनगर येथे एक झाड कोसळले. रहेमानिया कॉलनीतील गल्ली नंबर ११ मध्ये ४ फूट पाणी रस्त्यावर साचले होते.
शिवाजीनगर अंडरपासचे पाणीशिवाजीनगर भुयारी मार्गातील पाणी काढण्यासाठी अग्निशमन विभागाने धाव घेतली. पाण्याच्या मोटारी लावून पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केला. पाण्यात गाळ खूप असल्याने मोटारी चालविणे अशक्यप्राय होते. त्यानंतर वॉर्ड अभियंता यांनी जेसीबी आणून पाण्याला वाट मोकळी करून देण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.