विरोधकांचे गठ्ठे, तर सत्ताधाऱ्यांचे खोके! नामांतर आक्षेप, समर्थनांच्या छाननीला लागणार १५ दिवस
By विकास राऊत | Updated: March 29, 2023 14:44 IST2023-03-29T14:38:32+5:302023-03-29T14:44:49+5:30
आलेल्या आक्षेपांची छाननी होईल. त्यातून शहराला इतर नाव सुचविलेले व इतर आक्षेपार्ह आक्षेप वगळण्यात येतील.

विरोधकांचे गठ्ठे, तर सत्ताधाऱ्यांचे खोके! नामांतर आक्षेप, समर्थनांच्या छाननीला लागणार १५ दिवस
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नामांतराची वैधानिक लढाई जिंकण्यासाठी समर्थक आणि विरोधकांनी २७ मार्चला सायंकाळपर्यंत आक्षेप आणि सूचना विभागीय आयुक्तालयात दाखल केल्या. समर्थन आणि आक्षेपांची अर्जांची एकूण संख्या ७ लाख ४ हजार ६५६ आहे. याची छाननी पूर्ण होण्यासाठी सुमारे १५ दिवस लागतील. रोज १० ते १५ हजार अर्जांची छाननी होत असून, त्यात आक्षेप व समर्थनकर्त्यांची माहिती संकलित केली जात आहे. आयुक्तालयात ५०वर कर्मचारी डेटा एंट्री करण्यासाठी तैनात आहेत.
औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना केंद्राने काढली होती. त्यानंतर राज्य शासनाने दोन्ही शहरांच्या नामांतराबाबत २७ मार्चपर्यंत आक्षेप, हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. आलेल्या आक्षेपांची छाननी होईल. त्यातून शहराला इतर नाव सुचविलेले व इतर आक्षेपार्ह आक्षेप वगळण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक आक्षेपाची नोंद घेण्यात येईल. त्यानंतर ती माहिती राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. मंगळवारी दिवसभरात अनेक शिष्टमंडळांनी समर्थनार्थ आलेल्या अर्जांच्या आकड्यांवरून शंका व्यक्त करणारे निवेदन विभागीय प्रशासनाला दिले.
समर्थन अर्जांची चौकशी करा
शाहीन क्लब ऑफ औरंगाबादच्या शिष्टमंडळाने दुपारी उपायुक्त पराग सोमण यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शहराचे नाव छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आलेले अर्ज अर्धवट असल्याचे दिसते. त्यात रहिवासी पुरावा, ओळखीचा पुरावा जोडलेला नाही. या अर्जांची चौकशी करून ते रद्द करण्याची मागणी शेख जोहरी, अब्दुल सिद्दीकी, ताहीर मीर कादरी यांनी केली. उपायुक्त सोमण यांनी शिष्टमंडळाचे निवेदन विभागीय आयुक्तांसमोर ठेवण्यात येईल, असे सांगितले.
पूर्ण महिना गेला आकडेमोड करण्यात
आयुक्तालयातील आवक-जावक विभागातील कर्मचाऱ्यांचा २७ फेब्रुवारी ते २७ मार्च हा पूर्ण महिना आक्षेप व समर्थन अर्जांची आकडेमोड करण्यात गेला. समर्थन, आक्षेपांची दैनंदिन नोंद, छाननी, गठ्ठे बांधणे, प्रत्येक अर्जाची प्रत डेटा एंट्रीसाठी संबंधितांकडे पाठविण्याचे काम विभागातील कर्मचाऱ्यांनी केले. पुढील १५ दिवस अर्जांची छाननी करून डेटा एंट्री केली जाणार आहे.