छत्रपती संभाजीनगर : झाल्टा फाटा, समृद्धी महामार्गावर सुसाट वाहनांमुळे चौघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शहरातही अवघ्या १९ वर्षीय सुसाट कारचालकाने एका रिक्षाचालकासह दुचाकीस्वार तरुणाला उडवले. यात ३३ वर्षीय बुधाराम डंगुराम बिष्णोई (मूळ रा. बालोतरा, राजस्थान) यांचा मृत्यू झाला. जळगाव रोडवर रविवारी (दि. ८) हा अपघात झाला. पोलिसांनी बेजबाबदार कारचालक साहिल कैलास राऊत (१९, रा. बुलढाणा) याला अटक केली. न्यायालयाने त्याची सोमवारी हर्सुल कारागृहात रवानगी केली.
बुधाराम, भाऊ रमेश अन्य नातलगांसह शहरात मिठाई तसेच केटरिंगचा व्यवसाय करीत होते. रविवारी दुपारी १२ वाजता बुधाराम दुचाकीने हर्सुलकडे जात हाेते. जळगाव रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. सिडको बसस्थानकाच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या साहिलचे कारवरील नियंत्रण सुटले. कार दुभाजकावर चढून बुधाराम यांना धडकून रिक्षाचालक जावेद शेख यांच्या रिक्षावर आदळली. स्थानिकांनी धाव घेत दाेघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, बुधाराम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रिक्षाचालक जावेद यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतरही साहिलने सुसाट पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी त्याला पकडले. उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी त्याला अटक केली. बुलढाण्याचा साहिल आई-वडिलांसह शहरात लग्नासाठी आला होता. आई-वडिलांना कार्यक्रमस्थळी सोडून मित्राला भेटण्यासाठी तो जात होता.
आईपाठोपाठ सहा महिन्यांत मुलाचाही मृत्यू६ मार्च रोजी सुसाट कारच्या धडकेत प्रशांत गणेश गलबे (रा. पाथरी) या तरुणाचा मृत्यू झाला. ६ मार्च रोजी प्रशांत दुचाकीने भावासह गोेलवाडी फाट्यावरून वाळुजच्या दिशेने जात होते. यावेळी सुसाट कारचालकाने (एमएच ४८ - पी ५६०३) त्यांना मागून धडक दिल्याने प्रशांत यांचा तोल जाऊन ते डोक्यावर पडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी ३ वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सहा महिन्यांपूर्वी प्रशांत यांच्या आईचेही निधन झाले होते.
कारचालकामुळे चिमुकलीची मृत्यूशी झुंजवडिलांसोबत रस्त्याने पायी जाणारी आरोही बाबासाहेब मदने (रा. सोनगिरी, धाराशिव) ही आठ वर्षीय चिमुकली एका बेजबाबदार कारचालकाच्या वेगाच्या हौसेमुळे मृत्यूशी झुंज देत आहे. १ मार्च राेजी बाबासाहेब आईच्या उपचारांसाठी केशरनगरीतील भावाकडे आले होते. २ मार्च रोजी सकाळी १० वाजता ते आई, आरोहीसह बजाज रुग्णालयात जाण्यासाठी निघाले. घरातून बाहेर पडत कारच्या दिशेने जात असताना अरुंद रस्त्यावर वेगात जाणाऱ्या कारने आरोहीला उडवून पोबारा केला. यात आरोही जागीच बेशुद्ध पडली. या अपघातात तिच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. डोक्यामध्ये रक्तस्राव होऊन गाठी तयार झाल्या. शिवाय मांडीचे हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कारचालकावर (एमएच २० - एचएच ६१४१) ८ मार्च रोजी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : A speeding car in Chhatrapati Sambhajinagar killed a man and injured a rickshaw driver. The 19-year-old driver was arrested. Separately, previous incidents highlight the dangers of reckless driving, including a fatal accident involving a scooter and a car, and a child critically injured.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में तेज रफ्तार कार ने एक व्यक्ति की जान ले ली और एक रिक्शा चालक घायल हो गया। 19 वर्षीय ड्राइवर गिरफ्तार। लापरवाही से गाड़ी चलाने के खतरों को उजागर करने वाली पहले की घटनाओं में एक स्कूटर और कार से हुई घातक दुर्घटना और एक गंभीर रूप से घायल बच्चा भी शामिल है।