‘हारमन’मध्ये केमिकल स्फोट
By Admin | Updated: December 1, 2014 01:28 IST2014-12-01T01:25:20+5:302014-12-01T01:28:29+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील हारमन कंपनीत रविवारी रात्री अचानक दोन स्फोट झाले.

‘हारमन’मध्ये केमिकल स्फोट
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील हारमन कंपनीत रविवारी रात्री अचानक दोन स्फोट झाले. या स्फोटांनंतर कंपनीच्या गोडाऊनमधील केमिकलचे शेकडो बॅरल जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही भाजले नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
औषधी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार करणाऱ्या हारमन कंपनीत रविवारी रात्री ६.४५ वाजेच्या सुमारास एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. स्फोटांच्या आवाजासोबतच कंपनीतून शंभर फूट उंचीचे आगीचे लोळ उठले. या घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दल आणि एमआयडीसी सिडको पोलिसांना देण्यात आली.
पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कंपनीकडे जाणारा रस्ता सर्वसामान्यांसाठी पोलिसांनी बंद केला. कंपनी मार्गावर केवळ अग्निशामक दलाच्या गाड्यांनाच प्रवेश देण्यात येत होता. मनपा अग्निशामक दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचे चार टँकर आणि एमआयडीसी शेंद्रा येथील अग्निशामक दलाचा एक बंबही मदतीसाठी घटनास्थळी आला होता. सर्वांनी मिळून सुमारे एक तास अथक प्रयत्न केल्यानंतर आग नियंत्रणात आली.
केमिकलचे शेकडो ड्रम जळून खाक
आग विझविण्याचे काम सुरू असताना तेथील केमिकलच्या ड्रमचे स्फोट होत असत. आग ज्या ठिकाणी लागली होती ते कंपनीचे गोडाऊन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुमारे केमिकलचे शंभराहून अधिक ड्रम तेथे होते. याप्रसंगी कंपनीचे कामगारही आग विझविण्याकरिता अग्निशामक दलाच्या जवानांना मदत करीत होते.
अमोनिया गळतीमुळे स्फोट
अमोनियाच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला.
आग लागली तेव्हा दुसऱ्या पाळीचे सुमारे ८० कामगार ड्यूटीला होते. स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केले.
सुदैवाने त्या ठिकाणी एकही कामगार नव्हता. त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही.