वाळूपट्टे लिलावात बनवाबनवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:38 IST2017-11-14T00:38:14+5:302017-11-14T00:38:25+5:30
वाळूपट्ट्याच्या लिलावास विरोध करणा-या ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे मुद्दे तकलादू व मोघम स्वरूपाचे असून गावातील वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी ग्रामस्थ घेत नसल्याने या गावातील वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यास हरकत नसल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वाळूपट्टे लिलावात बनवाबनवी
संजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : वाळूपट्ट्याच्या लिलावास विरोध करणा-या ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे मुद्दे तकलादू व मोघम स्वरूपाचे असून गावातील वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी ग्रामस्थ घेत नसल्याने या गावातील वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यास हरकत नसल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा वाळूपट्ट्यांच्या लिलावास कडवा विरोध असतानाही असा अहवाल दिल्याने लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोरील अडचणी दूर झाल्या आहेत, तर दुसरीकडे गावक-यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणा-या पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातील बारा वाळूपट्ट्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार उपविभागीय अधिका-यांनी तहसीलदार व गटविकास अधिका-यांना वाळूपट्ट्यांच्या गावातील ग्रामपंचायतीचे ठराव तातडीने ग्रामसभा घेऊन सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार बारा पैकी सात ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांनी वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यास विरोध केला होता. पाच ग्रामपंचायतीने ठराव घेऊन लिलावास अनुमती दिली होती.
गोदाकाठावरील वाळूपट्ट्यातील वडवाळी, वाघाडी, दादेगाव जहांगीर, नायगाव भाग एक व दोन, मायगाव, आपेगाव या ग्रामपंचायतींनी विरोध केला.
पाटेगाव, हिरडपुरी, नवगाव, आवडे उंचेगाव व टाकळी अंबड या ग्रामपंचायतीने लिलाव करण्याचा ठराव मंजूर करुन सादर केला होता.
वाळूपट्ट्याच्या लिलावास विरोध करणा-या ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा बोलावून नकारात्मक ठरावाची कारणे तपासून निर्णय घेण्यात यावा व अहवाल सादर करावा, असे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले होते. यानुसार उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत १ नोहेंबर रोजी या गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली.