गारपीट नुकसानीचे होणार चावडी वाचन
By Admin | Updated: July 3, 2014 00:15 IST2014-07-03T00:14:10+5:302014-07-03T00:15:51+5:30
सतीश जोशी , परभणी गारपिटीमुळे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होऊनही ५० टक्के गावांनाच भरपाई मिळाली होती.

गारपीट नुकसानीचे होणार चावडी वाचन
सतीश जोशी , परभणी
गारपिटीमुळे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान होऊनही ५० टक्के गावांनाच भरपाई मिळाली होती. नुकसान झालेल्या सर्वांनाच गारपीट आणि अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत द्या, या मागणीसाठी केलेल्या विविध पक्ष, संघटनांच्या आंदोलनाला यश मिळाले असून या नुकसानीचे पुन्हा पंचनामे करुन चावडी वाचन केले जाणार आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास ४ लाख हेक्टरमध्ये रबीचे पीक घेतले होते. त्यापैकी जवळपास ५० टक्केच म्हणजे दीड लाख हेक्टरमधील पिकाच्या नुकसानीबद्दल शासनाने भरपाई दिली. परभणी तालुक्यामध्ये ७८ हजार हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असताना जवळपास ४० हजार हेक्टरमधील पिकाच्या नुकसानीबद्दल भरपाई मिळाली. उर्वरित ठिकाणी संपूर्णत: नुकसान झाले असताना त्यांचा समावेश या नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये केला गेला नाही. मनमानी आणि जागेवरच पंचनामे करुन या याद्या बनविल्या होत्या. पाथरीतालुक्यातील एका गावामध्ये ७५० एकर एकूण क्षेत्रफळापैकी ६५० एकरमध्ये उसाचे पीक होते. शासन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई पिकाच्या यादीत उसाचा समावेश नाही. असे असताना देखील महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या गावातील सर्वांनाच नुकसानीचे अनुदान दिले. या उलट शेजारच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही त्यांना एक रुपयाही भरपाई मिळालेली नाही. असे चित्र जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पहावयास मिळाले. परभणी तालुक्यामध्ये एका शिवेवर असलेल्या पोखर्णीला नुकसान भरपाई मिळाली. परंतु, आजुबाजूच्या बोरवंड बु., सुरपिंपरी आदी गावांचा त्यात समावेश नाही.
परभणी तालुक्यात ११६ गावांपैकी केवळ ३१ गावांचा गारपीट नुकसानग्रस्त यादीमध्ये आहे. उर्वरित ८२ गावे वगळली, अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यामध्ये देता येतील. या सर्व महसूल प्रशासनाच्या अनागोंदीबद्दल विविध पक्ष, संघटनांनी आंदोलने, रस्ता रोको केला. या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये नुकसानीचा आढावा घेऊन पाच पंचासमक्ष चावडी वाचन केले जाणार आहे. आठ दिवसात अहवाल मागवून शासनाकडे पाठविला जाईल. (जिल्हा प्रतिनिधी)
निवेदन देऊनही दुर्लक्ष-विलास बाबर
जिल्ह्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांना अनेक वेळा निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने दखल घेतली नाही. मनमानी करुन घरी बसूनच अनेक गावांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याचा आरोप कॉ. विलास बाबर यांनी लोकमतशी बोलताना केला.