‘चटणी’फेम चोर जेरबंद
By Admin | Updated: February 6, 2015 00:57 IST2015-02-06T00:41:05+5:302015-02-06T00:57:21+5:30
बीड : शहरातील एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून लुटण्याचा प्रयत्न सोमवारी सायंकाळी झाला होता. त्यानंतर अवघ्या दोन तासानंतर याच प्रकारे दुसऱ्या

‘चटणी’फेम चोर जेरबंद
बीड : शहरातील एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून लुटण्याचा प्रयत्न सोमवारी सायंकाळी झाला होता. त्यानंतर अवघ्या दोन तासानंतर याच प्रकारे दुसऱ्या व्यापाऱ्याजवळील पाच लाख रुपये पळवून नेले होते. हे दोन्ही गुन्हे उघड करुन सहा आरोपींना पकडण्यात दरोडा प्रतिबंधक विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुरुवारी यश मिळाले आहे.
गणेश प्रल्हाद भालशंकर (रा. हनुमान नगर बीड), बाबू विठ्ठल पवार (रा.वतारवेस बलभीम नगर बीड), बलवानसिंग नेपालसिंग टाक (वतारवेस नागोबागल्ली, बीड), दीपक सुरेश माने (रा. अयोध्या नगर बीड), दीपक चंद्रकांत घोरपडे (रा. जुना मोंढा पुला जवळ बीड), चंद्रकांत बाबूराव अनंतवार (रा. शिवणी ता. किनवट जि. नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत.
येथील व्यापारी प्रेमचंद बाबूलाल संचेती हे सोमवारी सायंकाळी मोटारसायकलवरून घरी जाताना विप्रनगर येथील पुलावर तीन इसमांनी त्यांना धक्का देऊन त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. संचेती यांनी त्यांना प्रतिकार केला असता आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्या हातावर करून पळ काढला.
त्यानंतर लगेचच एमआयडीसी भागात त्यांनी जयराम श्रीराम चरखा यांना टार्गेट केले. त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची बॅग हिसकावून पळून गेले होते. संचेती यांची बॅग लुटताना सहा जण होते. मात्र चरखा यांच्या जवळील बॅग घेऊन जाताना पहिल्या घटनेतील गणेश भालशंकर, बलवानसिंग टाक व इतर एकाचा समावेश होता.
दरम्यान, गणेश भालशंकर हा या घटनेचा मास्टरमार्इंड होता. त्याने दीपक घोरपडे याला विश्वासात घेऊन कोठे माल आहे का? अशी त्याच्याकडे विचारणा केली होती. घोरपडे हा संचेती यांच्याकडे पूर्वी कामाला होता. त्यामुळे त्याला दुकान केंव्हा बंद होते व ते घरी केंव्हा जातात, त्यांच्याकडे पैसे किती असतात, याची इत्यंभूत माहिती भालशंकरला दिली. त्यानुसार भालशंकरने आॅटोचालक बाळू पवार, बलवानसिंग टाक, दीपक माने, किनवट येथील चंद्रकांत अनंतवार यांना सोबत घेऊन सोमवारी दुपारी लूट करण्याचे ठरविले. दुकानाच्या आवारात त्याचे तीन साथीदार थांबले होते. संचेती हे दुकान बंद करत असताना त्याची माहिती फोनद्वारे भालशंकर व त्याच्या इतर दोन साथीदारांना दिली. संचेती हे दुचाकीवरून पुलाजवळ आले असता त्यांना धक्का देऊन त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जेंव्हा त्यांनी बॅग देण्यास विरोध केला, त्यावेळी टाक याने संचेती यांच्या हातावर कत्तीने वार केला. बोभाटा होईल, या भीतीने तिघे दुचाकीवरून निघून गेले.
या घटनेच्या अवघ्या दोन तासानंतर विप्रनगर भागात जवाहर चरखा यांना त्यांनी टार्गेट केले. मात्र या घटनेत भालशंकर व त्याचे दोन साथीदार यांचा समावेश असून इतर आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
ही कारवाई अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक सी. डी. शेवगण, सपोनि भारत राऊत, पोलीस कर्मचारी बबन राठोड, गणेश दुधाळ, संजय खताळ, मारूती सानप, मोहन क्षीरसागर, लक्ष्मण जायभाये, श्रीमंत उबाळे, मनोज वाघ, भास्कर केंद्रे, कल्याण औटे, सतीश सेलमोहकर, भारत बर्डे, रशीद खान, योगेश खटाणे, संतोष खांडेकर, विष्णू चव्हाण, औसेकर, मारूती जंगलीवाड यांनी केली. (प्रतिनिधी)
बीड शहरात चोरी झालेल्या भागाची पाहणी करून त्या भागातील चोरट्यांची माहिती घेतली. डोळ्यात चटणी टाकून पैसे लुटण्याचा प्रकार त्यांनी केवळ व्यसनापायी केला आहे. दिवसभर दारू प्यायची व पत्ते खेळायचे, अशी सवय त्यांना होती. त्यातून त्यांनी कृत्य केले असल्याचे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.
बीड शहरातील आरटीओ आॅफिसमधून पैसे घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यास अडवून पैसे लुटल्याची घटना घडली होती. त्यातील गणेश भालशंकर हा मुख्य आरोपी होता. त्याच्यावर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल आहेत. बाबू पवार याच्यावर चोरी, राईट व इतर एक गुन्हा दाखल आहे. त्यांनी हे गुन्हे २००८ ते २०११ च्या कालावधीत केले आहेत.