जीवनात चातुर्मासाने परिवर्तन
By Admin | Updated: June 30, 2014 01:06 IST2014-06-30T00:57:25+5:302014-06-30T01:06:34+5:30
औरंगाबाद : चातुर्मासादरम्यान जीवनातील विविध विषयांवर प्रवचन होणार आहे.

जीवनात चातुर्मासाने परिवर्तन
औरंगाबाद : चातुर्मासादरम्यान जीवनातील विविध विषयांवर प्रवचन होणार आहे. ज्यांना आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे असेल अशांनी प्रवचनात सहभागी व्हावे. जैनच नव्हे तर जैनेतर समाजबांधवांनीही या प्रवचनाचा लाभ घ्यावा, अशी साद जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. यांनी घातली. या सादला प्रतिसाद देत शेकडो उपस्थितांनी पुढील चार महिने दररोज एक तास प्रवचनाला येण्याचे आश्वासन दिले.
जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. ससंघाचे चातुर्मास प्रवेशानिमित्ताने आज सकाळी ११ वाजता जुन्या स्पेन्सर हॉल येथे भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जैनाचार्यांचे आगमन होताच उपस्थित शेकडो भाविकांनी जयघोष करीत स्वागत केले.
प्रारंभी खासदार विजय दर्डा, छत्तीसगढचे मंत्री राजेश मुनोत, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते रतनलाल बाफना, प्रकाश बाफना यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सत्कार आ. सुभाष झांबड यांनी केला. यावेळी महाराजांनी लिहिलेल्या ‘ शिक्षणना दुधमा संस्कारनी साकर’ या गुजराथी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत शहा यांनी, तर हिंदी भाषेतील ‘शिक्षा के दूध मे संस्कार की शक्कर’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्योजक सचिन नागोरी यांच्या हस्ते झाले. केस वाढवून देवानंद बनण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद बना, असा सल्लाही जैनाचार्यांनी दिला. यावेळी त्यांनी दुष्काळमुक्तीसाठी प्रार्थना केली.
तत्पूर्वी खा. विजय दर्डा यांनी सांगितले की, जैन समाजातील सर्व पंथीयांना एकत्र आणून १९९४ मध्ये नागपुरात सकल जैन समाज संघटना स्थापन केली. आज देशभरात सकल जैनांच्या एकजुटीचे कार्य सकल जैन समाज करीत आहे. महावीर जयंती सकल जैन समाजाच्या एकजुटीचे प्रतीक बनली आहे. औरंगाबादेतील सकल जैन समाजाने देशात आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन राजेंद्र दर्डा यांनी केले आहे.
प्रारंभी, आ. सुभाष झांबड यांनी प्रास्ताविक केले. मुंबईचे गायक दक्षेस शहा यांनी धार्मिक गीत सादर केले, तर सूत्रसंचालन हिमेशभाई चेन्नईवाले व महावीर पाटणी यांनी केले. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार, आ. कल्याण काळे, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव औताडे, उद्योजक प्रदीप धूत, रवींद्र काळे, नगरसेवक प्रशांत देसरडा, प्रफुल्ल मालाणी, नंदकुमार घोडेले आदींची प्रमुख उपस्थिती होती. जैन समाजातील सर्व पंथांचे अध्यक्ष, पदाधिकारी, तसेच विनोद मंडलेचा, देवेंद्र जेलमी, मनोज चोपडा, पंकज संचेती यांच्यासह सकल जैन समाज व श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सकारात्मक परिणाम जीवनात दिसतील
जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा. यांनी सांगितले की, जीवनात योग, प्रयोग, पीडा, प्रसन्नता, परिणाम हे सर्वांच्या अनुभवास येते. तुमच्या जीवनात प्रवचनाचा योग आला आहे. त्यासाठी तुम्हाला निवासस्थानापासून प्रवचनस्थळापर्यंत यावे लागणार आहे. हा प्रयोग करताना तुम्हाला पीडा होईल; पण त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकेल व त्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम जीवनात दिसून येतील.