'प्रभारी'च कारभारी

By Admin | Updated: July 21, 2014 00:21 IST2014-07-20T23:59:28+5:302014-07-21T00:21:16+5:30

संजय तिपाले , बीड ग्रामीण विकासाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये 'प्रभारीराज' निर्माण झाले आहे़ १४ पैकी ६ विभागांमध्ये प्रभारी अधिकारी कारभार पाहत आहेत़

In-charge in charge | 'प्रभारी'च कारभारी

'प्रभारी'च कारभारी

संजय तिपाले , बीड
ग्रामीण विकासाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये 'प्रभारीराज' निर्माण झाले आहे़ १४ पैकी ६ विभागांमध्ये प्रभारी अधिकारी कारभार पाहत आहेत़ पंचायत समित्यांमध्येही याहून वेगळी परिस्थिती नाही़ ११ पैकी ७ पंचायत समित्यांत अशी स्थिती आहे. उल्लेखनीय म्हणजे ५ पंचायत समित्यांमध्ये वर्ग ३ चे कर्मचारी गटविकास अधिकारीपदाच्या खुर्चीत बसून कारभार सांभाळत आहेत.
अंबाजोगाई, केज, परळी व गेवराई येथे सध्या पूर्णवेळ गटविकास अधिकारी आहेत. केजमध्ये गणेश आगर्ते, परळीत प्रमोद बन्सोड, अंबाजोगाईत अंकुश चव्हाण तर गेवराईत जी. बी. सावंत आहेत. उर्वरित सात ठिकाणी मात्र, वर्ग २ किंवा वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याने पंचायत समित्यांच्या कामकाजात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतही अडथळे येऊ लागले आहेत. प्रभारी अधिकारी कारभारी झाल्याने पंचायत समित्यांमधील कामकाज ढेपाळले आहे.
येथे प्रभारी ‘बीडीओ’...
बीडमध्ये के. बी. शेळके, शिरुरमध्ये राजेंद्र मोराळे, पाटोद्यात बापूसाहेब राख, आष्टीत उद्धव सानप, वडवणी येथे सी. एम. ढोकणे, माजलगावात सुभाष गडदे व धारुरात संजय केेंद्रे यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे़ शिरुर, वडवणी व धारुर वगळता इतर पाच ठिकाणी वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांकडे गटविकास अधिकारीपदाचा भार आहे़
अतिरिक्त सीईओही दीर्घ रजेवर
अतिरिक्त सीईओ डॉ. अशोक कोल्हे हे देखील महिन्यापासून रजेवर आहेत. झेडपीआर, दलित वस्ती कामातील अनियमिततेविरुद्ध डॉ. कोल्हे यांनी चौकशी सुरु केली होती. काही सदस्यांनी त्यांच्या दालनात जाऊन आगपाखड केली. त्यानंतर ते दीर्घ रजेवर गेले आहेत. अतिरिक्त सीईओपदाचा कारभार सध्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती सांभाळत आहेत.
अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला
जि़ प़ मध्ये एकूण १४ विभाग आहेत़ त्यापैकी ६विभागांमध्ये 'प्रभारीराज' आहे़ प्राथमिक शिक्षण विभागात एस़ वाय़ गायकवाड, लघु पाटबंधारे विभागात एस़ आऱ कुलकर्णी, पशु संवर्धन विभागात डॉ़ डी़ बी़ मोरे, समाज कल्याण विभागात एस़ ए़ शेळके, ग्रामीण विकास यंत्रणेत ए़ जे़ गित्ते हे प्रभारी अधिकारी काम पाहत आहेत़ बांधकाम विभाग २ मध्येही पूर्णवेळ कार्यकारी अभियंता उपलब्ध नाहीत़ तेथे बांधकाम विभाग १ चे कार्यकारी अभियंता एस़ आऱ शेंडे हेच प्रभारी आहेत़ अतिरिक्त कार्यभारामुळे अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे़
पाठपुरावा सुरू
सीईओ राजीव जवळेकर म्हणाले, गटविकास अधिकाऱ्यांची पदे निवृत्ती, बदल्यांमुळे रिक्त आहेत़ रिक्त पदांवर पर्यायी अधिकारी दिले आहेत़ त्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होतात, असे नाही़ पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़

Web Title: In-charge in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.