'चपटेदान, लाभेश, चरणदास, लंगोटिया'; छत्रपती संभाजीनगरात अनोख्या नावांची २११ हनुमान मंदिरे

By प्रशांत तेलवाडकर | Published: April 8, 2023 07:37 PM2023-04-08T19:37:53+5:302023-04-08T19:38:12+5:30

शहरात हजारापेक्षा अधिक मंदिरे असून, त्यात एकट्या रामभक्त हनुमानाची २११ मंदिरे आहेत.

'Chaptedan, Labesh, Charandas, Langotia'; 211 Hanuman temples with unique names in Chhatrapati Sambhajinagar | 'चपटेदान, लाभेश, चरणदास, लंगोटिया'; छत्रपती संभाजीनगरात अनोख्या नावांची २११ हनुमान मंदिरे

'चपटेदान, लाभेश, चरणदास, लंगोटिया'; छत्रपती संभाजीनगरात अनोख्या नावांची २११ हनुमान मंदिरे

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : कासारी बाजारातील लंगोटिया, जाधवमंडीतील जबरे, नागोसानगरातील कानफाटे, कैलासनगरातील स्मशान, पिसादेवीतील चपटेदान, वाळूजमधील लाभेश हे नाव ऐकून तुम्हालाही कुतूहल वाटले असेल. ही सर्व नावे हनुमानाची आहेत. या आगळ्या-वेगळ्या नावामागील रहस्य तुम्हाला त्या मंदिरात जाऊनच कळेल, हे विशेष. छत्रपती संभाजीनगरात अशी २११ हनुमानाची मंदिरे आहेत. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी व शोध घेण्यासाठी अनेक दिवस लागतील. उल्लेखनीय म्हणजे यातील ९५ हनुमान मंदिरांचे नामकरणच झालेले नाहीत.

गुरुवारी ६ एप्रिलला सर्वत्र हनुमान जन्मोत्सव आहे. ५० वर्षांपूर्वी शहरात बोटावर मोजण्या इतकेच हनुमान मंदिर होते. मात्र, जसजसा शहराचा विस्तार वाढत गेला तसतसे मंदिरांची संख्याही वाढत गेली. शहरात हजारापेक्षा अधिक मंदिरे असून, त्यात एकट्या रामभक्त हनुमानाची २११ मंदिरे आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन हनुमान मंदिरांचा शोध घेत त्याच्या इतिहासाचे संकलन विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक डॉ. अनिल मुंगीकर यांनी केले आहे.

अशी आहेत मंदिरे: 
२५ जागृत हनुमान मंदिरे
२४ दक्षिणमुखी हनुमान मंदिरे
१४ संकटमोचन हनुमान मंदिरे
५ पवनपुत्र हनुमान मंदिरे
५ महारुद्र हनुमान मंदिरे

गंगाधन हनुमान झाला ५० वर्षांचा
नवाबपुरातील शहरातील एकमेव हनुमान बैठक असलेला व ७ फूट उंचीचा गंगाधन हनुमान मूर्ती स्थापनेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. पाहता क्षणी भाविक या मूर्तीसमोर नतमस्तक होत असतात. या मूर्तीची स्थापना नारायणसिंह होलिये यांनी केली. आई गंगाबाई व व वडील धनिरामसिंह यांच्या नावाचे एकत्रीकरण करीत ‘गंगाधन’ असे हनुमानाला नाव दिले. गुरुवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवापासून या मंदिराचे सुवर्ण महोत्सवी वर्षे सुरू होत आहे, यानिमित्त १५ किलो चांदीच्या अलंकाराने हनुमानाला सजविले जाणार असल्याचे जयसिंह होलिये यांनी सांगतले.

Web Title: 'Chaptedan, Labesh, Charandas, Langotia'; 211 Hanuman temples with unique names in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.