जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे..!
By Admin | Updated: May 11, 2015 00:31 IST2015-05-11T00:29:13+5:302015-05-11T00:31:39+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचे जोरदार वारे वाहू लागले आहे. सर्वाधिक कर्मचारी वर्ग असलेल्या शिक्षण विभागामध्ये मोठी लगबग सुरू आहे

जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे..!
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचे जोरदार वारे वाहू लागले आहे. सर्वाधिक कर्मचारी वर्ग असलेल्या शिक्षण विभागामध्ये मोठी लगबग सुरू आहे. यंदा जिल्हास्तरावर प्रशासकीय बदल्या नाहीत. मात्र, विनंतीनुसार बदल्या होणार आहेत. जिल्ह्यातील अंदाजे ४०० वर कर्मचारी विनंती बदलीसाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे तालुकास्तरावर विनंती आणि प्रशासकीय दोन्ही प्रकारच्या बदल्या केल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषदअंतर्गत सर्वाधिक कर्मचारी हे शिक्षण विभागात आहेत. तब्बल पाच ते साडेपाच हजार शिक्षक आहेत. त्यामुळे बदली प्रक्रियेलाही तितकाच वेळ लागतो. ही बाब लक्षात घेवून शिक्षण विभागाकडून मागील आठ ते दहा दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. तेव्हापासूनच बदल्यांचे वारण अधिक गतीमान झाले आहे. यंदा जिल्हास्तरावर प्रशासकीय बदल्या नाहीत. त्यामुळे केवळ विनंतीनुसार बदल्या केल्या जाणार आहेत. त्याही ५ टक्के. असे असले तरी इच्छुकांची संख्या मात्र मोठी आहे. तब्बल चारशेवर शिक्षकांनी विनंती बदली हवी आहे, असे शिक्षण विभागाला कळविले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून पात्र शिक्षकांची यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदरील प्रक्रिया वेळेत व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने काही कर्मचाऱ्यांना सुटीचेही बोलावून कामे करून घेतली जात आहेत.
इच्छुकांची संख्या ४०० वर असली तरी प्रत्यक्ष निवड प्रक्रियेवेळी योग्य शाळा न मिळाल्यास ही संख्या कमी होवू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हास्तरावर प्रशासकीय बदल्या नसल्या तरी तालुकास्तरावर मात्र दोन्ही प्रकारच्या बदल्या होणार आहेत. प्रशासकीय १० टक्के तर विनंतीनुसार ५ टक्के बदल्या केल्या जाणार आहेत. या माध्यमातूनही सुमारे साडेचारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या होवू शकतात, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)