मराठवाड्यातील ‘महसूल’च्या बदल्या रखडल्या
By Admin | Updated: June 12, 2016 00:02 IST2016-06-11T23:53:26+5:302016-06-12T00:02:58+5:30
बदल्यांची मंजूर केलेली संचिका मंत्रालयीन स्तरावर रोखण्यात आल्यामुळे मराठवाड्यातील सुमारे ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता मावळल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील ‘महसूल’च्या बदल्या रखडल्या
औरंगाबाद : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा देण्यापूर्वी ११० अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांची मंजूर केलेली संचिका मंत्रालयीन स्तरावर रोखण्यात आल्यामुळे मराठवाड्यातील सुमारे ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता मावळल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. बदली करण्यासाठी ‘टोकण’ दिलेल्या अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून, अनेकांनी संसारोपयोगी साहित्याचे शिफ्ंिटगदेखील केले आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. कुटुंबाचे बिऱ्हाड हलविल्यामुळे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहणार
आहेत.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी आठवडा शिल्लक आहे. दहावी आणि बारावीचे निकाल लागले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे असे जिल्हे मुलांच्या शिक्षणामुळे निवडून तिकडे बदली करून घेण्यासाठी विभागात काम करून कंटाळलेल्या अधिकाऱ्यांनी बदलीसाठी लॉबिंग करून प्रयत्न केले होते. शाळा, महाविद्यालयांमध्ये वेळेत प्रवेश न मिळाल्यास मोठ्या पेचप्रसंगाला बदली इच्छुकांना सामोरे जावे लागेल.
ठरल्याप्रमाणे १० जूनपर्यंत त्या बदल्या होण्याची पूर्ण शक्यता होती; परंतु मुख्यमंत्र्यांनी बदल्यांची संचिका योग्य मार्गाने यावी, यासाठी ती रोखली आहे. परिणामी मराठवाड्यातील बदली इच्छुकांच्या गुडघ्याचे बाशिंग गळाले आहे. ज्यांच्या बदल्या होणार व तेथे आपली वर्णी लागणार, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले होते, त्यांच्याही मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.
विभागीय आयुक्तालयामध्ये काही पदे रिक्त आहेत. तसेच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातही काही पदे रिक्त आहेत. १० जूनपूर्वी होणाऱ्या बदल्यांमध्ये विभागातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मराठवाड्यातून बदलून जायचे होते; परंतु काहींना बदलीची इच्छा नाही, त्यांची आहे त्या ठिकाणीच चांगली घडी बसली आहे. बदलीची संचिकाच मुख्यमंत्र्यांनी ‘गाठभेट संस्कृती’ मुळे रोखल्याने सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आॅक्टोबर-२०१५ ते मे- २०१६ या काळात मराठवाड्यातील सुमारे ७५ तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये आणखी ३५ अधिकाऱ्यांची भर पडली असती.
त्या ‘उसनवार’ उपजिल्हाधिकाऱ्याची बदली
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कार्य अधिकारी या पदावर ‘उसनवार’ तत्त्वावर कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी उन्मेष महाजन यांना ६ जून रोजी कार्यमुक्त करण्यात आले.
त्यांना त्यांच्या मूळ विभागात बदली करण्याचे आदेश ८ जून रोजी महसूल विभागाने काढले होते. महाजन हे खडसे यांचे कार्य अधिकारी म्हणून दीड वर्षापासून कार्यरत होते.