जिल्हा परिषदेची प्रतिमा सुधारण्याचे विजयसिंहांपुढे आव्हान
By Admin | Updated: September 23, 2014 23:42 IST2014-09-23T23:38:33+5:302014-09-23T23:42:40+5:30
बीड :विकासकामातील अनियमितता, पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर न राहिलेला वचक, कर्मचाऱ्यांतील वाढती बेशिस्त... या आणि अशा कित्येक कारणांमुळे मिनीमंत्रालयाची प्रतिमा मलिन झाली आहे़

जिल्हा परिषदेची प्रतिमा सुधारण्याचे विजयसिंहांपुढे आव्हान
बीड :विकासकामातील अनियमितता, पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर न राहिलेला वचक, कर्मचाऱ्यांतील वाढती बेशिस्त... या आणि अशा कित्येक कारणांमुळे मिनीमंत्रालयाची प्रतिमा गेल्या काही दिवसांत पुरती मलिन झाली आहे़ आता जिल्हा परिषदेत ‘नवा गडी नवे राज’ आहे़ प्रशासकीय शिस्तीबरोबरच पक्षांतर्गत सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करुन विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचे आव्हान नूतन अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यापुढे राहील़
नशीबाने साथ दिल्याने रविवारी जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यात आघाडीला यश आले़ राष्ट्रवादीतच राहून सवते सुभे जपणाऱ्या नेत्यांतील राजकीय ‘वाटाघाटी’ तोलून- मापून आहेत़ कालपर्यंत मिनीमंत्रालयात राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे ‘रिमोट’ होता आता आ़ अमरसिंह पंडित यांचा प्रभाव राहील़
विकासकामातील अनियमितता, चौकशीचा लागलेला ससेमिरा, बदल्यातील घोळ यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत़ सहकाऱ्यांशी कामवाटपावरुन मंत्रालयात झालेला ‘धिंगाणा’ असो की, अधिकाऱ्यांना धमकावल्याचे पोलिसात गेलेले प्रकरण असो तत्कालिन अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला हे नेहमीच टीकेचे धनी ठरले़ त्यांना अध्यक्षपदाचा रुबाब कधी जमला नाही़ ते पायउतार झाले़ अध्यक्षपदाचा काटेरी मुकूट आता विजयसिंहांच्या डोक्यावर आहे़ ते लवकरच पदभार घेतील़ आचारसंहिता संपल्यावर ते प्रत्यक्ष कामाला लागतील़ प्रशासकीय सुधारणा व पक्षांतर्गत सहकाऱ्यांचे पाठबळ मिळविणे अशा दोन आघाड्यांवर त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे़
यापूर्वी विजयसिंह पंडित हे जि़प़ मध्ये सभापती राहिलेले आहेत़ शिवाय गेवराई पंचायत समितीत उपसभापतीपदाचा काभारही त्यांनी पाहिलेला आहे़ त्यामुळे ते अगदीच नवखे आहेत असे नाही़ अध्यक्षपदावरुन त्यांना जबाबदारीने काम करावे लागेल़ गटातटात विखूरलेल्या पक्षातीलच सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करणे हे त्यांच्यापुढचे पहिले आव्हान असेल़ त्यानंतर विकासकामांत कोठेही असमतोल राहणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे़ अधिकाऱ्यांना ‘टक्केवारी’त मिंदे करत बोगस कामांत हातखंडा असलेल्या गुत्तेदार कार्यकर्त्यांवरही अंकुश ठेवावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे अधिकारी, कर्मचारी खुर्चीत बसत नाहीत. ‘दाम’ दाखविल्याशिवाय सामान्यांचे काम नाही, अशी स्थिती असलेल्या कारभारात सुधारणा कराव्या लागतील. कुठलीही फाईल रितसर ‘मूव्ह’ होण्याऐवजी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे घेऊन जाणाऱ्या दलालांनाही ‘ब्रेक’ लावावा लागेल. हे झाले जिल्हा परिषदेतील प्रशासनाचे. गावपातळीवर काम करणारे शिक्षक, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर या कामांतही दुरुस्ती करावी लागेल.
तिजोरीत खडखडाट!
जिल्हा परिषदेने झेडपीआर, तेराव्या वित्त आयोगाच्या योजनांत उपलब्ध निधीपेक्षा दुप्पट निधीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत़ त्यापैकी काही कामांची देयके निघालीही आहेत़ काही कामांची देयके बाकी आहेत़ तिजोरीत खडखडाट आहे़ अशा स्थितीत विजयसिंह पंडित यांना राज्य, केंद्राकडून निधी खेचून आणावा लागेल. यात त्यांचे कौशल्य पणाला लागणार आहे.