बाजार समितीच्या निमंत्रक संचालक निवडीला आव्हान
By Admin | Updated: July 6, 2016 23:55 IST2016-07-06T23:53:34+5:302016-07-06T23:55:18+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमंत्रक संचालक हरीश पवार व सर्जेराव मते यांच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे

बाजार समितीच्या निमंत्रक संचालक निवडीला आव्हान
औरंगाबाद : औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमंत्रक संचालक हरीश पवार व सर्जेराव मते यांच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. एल. वडणे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत उत्तर दाखल करण्यासाठी सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी वेळ मागितला. खंडपीठाने त्यास परवानगी दिली .
औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाने विशेष निमंत्रित तज्ज्ञ संचालक म्हणून हरीश पवार व सर्जेराव मते यांची नियुक्ती केली. या दोघांनीही २०१५ बाजार समितीची निवडणूक लढवली होती. सर्जेराव मते यांनी सहकारी संस्था मतदारसंघातून तर हरीश पवार यांनी व्यापारी मतदारसंघातून निवडणूक लढवली.
मात्र दोघेही पराभूत झाले, असे असताना शासनाने १० मार्च २०१६ रोजी त्यांची नियुक्ती केली. या निवडीला सभापती संजय औताडे यांनी आव्हान दिले.
दोघेही नियुक्त संचालक हे पराभूत उमेदवार आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे शासनाचा अध्यादेश रद्द करून त्यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. राज्य शासन, महाअधिवक्ता, सहकारमंत्री, पणन संचालक व जिल्हा उपनिबंधक यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे हे बाजू मांडत आहेत.
या याचिकेबरोबर भुसावळ बाजार समिती, बेल्हेकरवाडी विविध कार्यकारी सोसायटी यांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे व अॅड. विक्रम धोर्डे तर राज्य शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे हे बाजू मांडत आहेत. या याचिकांची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे .