पालिका शाळांना चक टीनपत्रांचे शेड गाळ्यांमध्ये
By Admin | Updated: March 4, 2015 00:22 IST2015-03-04T00:17:49+5:302015-03-04T00:22:55+5:30
संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गेल्या आठवडाभरात तपासणी करण्यात आलेल्या नगरपालिकेच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग चक्क टीनपत्रांचे शेड,

पालिका शाळांना चक टीनपत्रांचे शेड गाळ्यांमध्ये
संजय कुलकर्णी , जालना
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गेल्या आठवडाभरात तपासणी करण्यात आलेल्या नगरपालिकेच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग चक्क टीनपत्रांचे शेड, गाळे किंवा समाजमंदिरातच सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची किंवा स्वच्छतागृहांची देखील व्यवस्था नसल्याचे उघडकीस आले.
शहरातील २१ नगरपालिका शाळांपैकी काही शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत झालेल्या तपासणीमध्ये शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची व्यवस्थाच नसल्याचे उघडकीस आले आहे.
जि.प. शिक्षण विभागाच्या पथकाने उर्दू माध्यमातील ५ शाळांची तपासणी केली. यात डबलजीन भागातील शाळा गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. परंतु ही शाळा बंद असल्याचे या पथकाला तेथे गेल्यानंतरच समजले. परंतु मराठी माध्यमांच्या पहिली व दुसरीच्या वर्गात प्रत्येकी एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यांना संयुक्तपणे एक मुख्याध्यापक व एक शिक्षक अध्यापन करतात. टाऊनहॉल येथे उर्दू शाळेत दोन विद्यार्थ्यांसाठी एक तर मराठी शाळेत १५ विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक कार्यरत असल्याचे आढळून आले.
मस्तगड भागातील मराठी व उर्दू माध्यमांचे पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. तेथील मुख्याध्यापक शेख हरूण म्हणाले, या शाळेत ७८ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना अध्यापन करण्यासाठी ६ शिक्षक कार्यरत आहेत. संजयनगर भागातील उर्दू माध्यमाची शाळा समाजमंदिरामध्येच भरविण्यात येत आहे. तेथे पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये एकूण ३२ विद्यार्थी आढळून आले. उपस्थित शिक्षकांनी एकूण विद्यार्थी ३९ असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्यांना दोन शिक्षक अध्यापन करतात. या शाळेत मात्र विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही.
एसआरपीएफ परिसरातील शाळा औरंगाबाद रोडवरील फुकटनगर भागात स्थलांतरित झालेली आहे. येथील पहिली व दुसरी अशा दोन वर्गांसाठी एकूण १७ विद्यार्थी असून ही शाळा चक्क टीनशेडमध्ये सुरू असल्याचे निदर्शनास आले. या विद्यार्थ्यांसाठी तेथे दोन शिक्षक कार्यरत आहेत.
नवीन मोंढ्याजवळील हिंदनगर भागात तर दोन गाळ्यांमध्येच शाळा सुरू असल्याचे दिसून आले. ही शाळा पूर्वी कादराबाद भागात सुरू होती. परंतु विद्यार्थी न मिळाल्याने २ वर्षांपासून या भागात भरते. या शाळेत पहिली ते तिसरी अशा तीन वर्गांसाठी एकूण विद्यार्थी १५ असून त्यांना २ शिक्षकांमार्फत अध्यापन केले जाते.
या पथकातील सदस्य अहेमद नूर यांना विचारणा केली असता, त्यांनी उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये आढळून आलेल्या वरील प्रकारास दुजोरा दिला.