औरंगाबादेत रस्त्यात अडवून शिवसेना नगरसेवकावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:38 IST2018-10-30T22:38:05+5:302018-10-30T22:38:49+5:30
शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार (४३) यांना एकाने रस्त्यात अडवून चाकूहल्ला केला. या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

औरंगाबादेत रस्त्यात अडवून शिवसेना नगरसेवकावर चाकूहल्ला
औरंगाबाद : शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार (४३) यांना एकाने रस्त्यात अडवून चाकूहल्ला केला. या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ गजानननगर भागात मंगळवारी (दि़ ३०) सकाळी ११ वाजता ही घटना घडली़ चाकूहल्ला करणारा आरोपी आकाश पडूळ ऊर्फ शेऱ्या याला पुंडलिकनगर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली.
आकाश सराईत गुंड असून त्याला भूमाफिया हुसैन खान अल्यार खान हत्याकांडात अटक करण्यात आली होती़.
गजानननगर वॉर्डाचे शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्या घरासमोर सोमवारी (दि़.२९) रात्री आरोपी आकाश पडूळ आणि त्याच्यासोबतचे काही तरुण टवाळखोरी करीत होते़ हा प्रकार रस्त्यावर सुरू होता. पवार यांनी हा प्रकार पाहिला़ त्यांनी तरुणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पवार यांच्याशी वाद घातला़ या वादानंतर आकाश पडूळ याने रात्री पवार यांच्या कारची काच फोडली़ परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद रात्रीच मिटविला़ पवार आणि आकाश पडूळ हे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रस्त्यावर आमनेसामने आले. आकाशने रात्रीचा राग डोक्यात ठेवलेला होता़ नगरसेवक पवारसमोर येताच त्यांच्या डोक्यात चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
हल्लेखोरास अटक
फौजदार रामचंद्र पवार, पोहेकॉ. रमेश सांगळे, संतोष पारधे यांनी आकाश पडूळ यास हनुमाननगरात पकडून ठाण्यात आणले. आरोपी विरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.