नगरसेविकेच्या पतीवर चाकूहल्ला
By Admin | Updated: March 10, 2016 00:42 IST2016-03-10T00:26:23+5:302016-03-10T00:42:33+5:30
परंडा : वाळूच्या प्रकरणातून नगरसेविकेच्या पतीवर भरदिवसा चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी दुपारी घडली.

नगरसेविकेच्या पतीवर चाकूहल्ला
परंडा : वाळूच्या प्रकरणातून नगरसेविकेच्या पतीवर भरदिवसा चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी दुपारी घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील सतीश मेहेर हे दुपारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका हॉटेलसमोर दोन मित्रांसोबत चहा घेत होते. यावेळी इंद्रजीत महाडिक (रा. मुंगशी, ता. माढा) व त्याचे दोन साथीदार दुचाकीवरून तेथे आले. प्रारंभी या तिघांनी शिवीगाळ करून मुंगशी शिवारातील सीना नदीच्या पात्रातून भरून आलेल्या वाळूच्या ट्रकची माहिती तलाठी व पोलिसांना का देतो, अशी विचारणा करीत धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. यावेळी सतीश मेहेर यांचे मित्र बालाजी सोनवणे व रामलिंग गायकवाड हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच इंद्रजीत महाडिक याने त्याच्या कंबरेचा चाकू काढून मेहेर यांना मारण्याचा प्रयत्न केला. मेहेर यांनी हा वार चुकविला, मात्र या झटापटीत बालाजी सोनवणे यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूचा वार बसला.
ही हाणामारी सुरू असतानाच पोलिस गाडी घटनास्थळी आल्यामुळे महाडिक हा दोघा साथीदारांसह तेथून पळून गेला. याप्रकरणी सतीश विश्वनाथ मेहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिस ठाण्यात इंद्रजीत महाडिक व इतर दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि जी. डी. सूर्यवंशी करीत आहेत. (वार्ताहर)