गारपीटग्रस्तांचा धडकला मोर्चा
By Admin | Updated: June 28, 2014 01:14 IST2014-06-27T23:52:08+5:302014-06-28T01:14:33+5:30
परभणी: गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईतून वगळण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी,
गारपीटग्रस्तांचा धडकला मोर्चा
परभणी: गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईतून वगळण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
अवकाळी पाऊस व गारपिटीतील नुकसानीच्या भरपाईपासून जिल्हा प्रशासनाने हजारो शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे. अनुदान वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करुन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. अनुदान मिळालेल्या गावाला लागून असलेल्या दुसऱ्या गावातील शिवारातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईतून वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शेतीमालाच्या किमान आधारभूत किमती केवळ कागदावरच आहेत. ५ मे रोजी अनुदानापासून वगळलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी ७१ अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या सर्व गावांतील शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना राज्य अधिवेशनामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिल्या आहेत. त्यावर प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. नुकसान भरपाई वाटप न झाल्यास जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
कॉ.विलास बाबर, कॉ.लिंबाजी कचरे, कॉ.किर्तीकुमार बुरांडे, उद्धव पौळ, दीपक लिपने, शिवराज सोनटक्के, ज्ञानोबा दळवे, उत्तम शेळके, पांडुरंग पवार, सुभाषराव गोरे, एकनाथ सिरसाट, त्र्यंबक वैरागर, विष्णू मोगले, राजेंद्र मोरे, बळीराम शिंदे आदींसह बहुसंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
मोर्चेकऱ्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी स्वीकारले. यासंदर्भात ३० जून रोजी बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.(प्रतिनिधी)