औरंगाबाद विमानतळाला केंद्राने संभाजी महाराजांचे नाव द्यावे: उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 18:31 IST2022-01-27T18:29:26+5:302022-01-27T18:31:34+5:30
भाजप नेत्यांनी दिल्लीत वजन वापरण्याचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

औरंगाबाद विमानतळाला केंद्राने संभाजी महाराजांचे नाव द्यावे: उद्धव ठाकरे
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. केंद्रात वजन असलेल्या भाजपच्या नेत्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आणावा, अशा शब्दांत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.
मंगळवारी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिराच्या लोकार्पण साेहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री सुभाष देसाई, खा. इम्तियाज जलील, आ. संजय शिरसाठ, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, हरिभाऊ बागडे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, माजी सभापती राजू वैद्य, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी नगरसेविका अंकिता विधाते, शिल्पा वाडकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून आवडत्या औरंगाबाद शहरात येता आले नाही. त्याची रुखरुख आहे. लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. १९८७-८८ मध्ये सांस्कृतिक मंडळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विराट सभा झाली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आजपर्यंत करीत आलोय. तेव्हापासून आजपर्यंत महापालिकेवर भगवा फडकतोय. तो उतरणारही नाही. नाट्यगृह काळाची गरज होती. आज ‘संत एकनाथ’ला वेगळा साज चढविण्यात आल्याचे दिसून येत आहे. मी लवकरच पाहणीसाठी येईन. तत्पूर्वी प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रास्ताविक केले.
विकासकामांसाठी जिद्द हवी
गुंठेवारीचा प्रश्न, खराब रस्ते, पाणीप्रश्न सोडविण्यात आला. प्रत्येक विषयात मार्ग निघतोच, त्यासाठी जिद्द असायला हवी. औरंगाबादेत भाषणांमध्ये नागरी विषयांना हात घालताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होत असायचा. शिवसेनेने दिलेली आश्वासने पूर्ण केली, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
साेहळ्यास सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यांना पाहून मुख्यमंत्र्यांनी कॅमेरा प्रत्येकावर फिरवायला लावला. हा फोटो काढून मला पाठवा. विकासासाठी सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर येण्याची आपली संस्कृती आहे. मी तिथे असतो तर सर्वांना शाल, श्रीफळ दिले असते. आता येथूनच ई-पुष्प देतोय, त्याचा स्वीकार करावा, असे ते म्हणाले.
विंचू चावला...
रंगमंदिराला नाथांचे नाव आहे. मला ‘विंचू चावला’ भारूड आठवतेय. हा वेगळा विंचू आहे. पूर्वी जंतर-मंतरने तो उतरविला जायचा. नाथांची शिकवण आपण आचरणात आणावी. पैठणला संतपीठ करतोय, चांगले उद्यान करतोय, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.