विद्यापीठ सत्तेचा केंद्रबिंदू पैठणकडे; प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वर्चस्व
By राम शिनगारे | Updated: October 12, 2023 12:51 IST2023-10-12T12:50:30+5:302023-10-12T12:51:46+5:30
व्यवस्थापन परिषद, अधिसभेवर प्रत्येकी दोन सदस्य तर विद्या परिषदेत तीन सदस्य

विद्यापीठ सत्तेचा केंद्रबिंदू पैठणकडे; प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वर्चस्व
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध महत्त्वाच्या प्राधिकरणांवर पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांनी वर्चस्व निर्माण केले आहे. त्याशिवाय याच महाविद्यालयातील प्राध्यापकांचेही विविध प्राध्यापक संघटनांवरही प्रभुत्व आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सत्तेचा केंद्रबिंदू पैठणकडे सरकला असल्याचे स्पष्ट झाले.
विद्यापीठाच्या सर्वाधिक महत्त्वाच्या व्यवस्थापन परिषदेसह अधिसभेवर प्रतिष्ठानमधील नितीन जाधव हे संस्थाचालक गटातून बिनविरोध निवडून आले. विद्या परिषदेच्या महिला गटातून डॉ. अपर्णा पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवून व्यवस्थापन परिषदेत स्थान मिळवले. तत्पूर्वी, त्या हिंदी अभ्यास मंडळाच्या कुलगुरू नियुक्त सदस्य व तेथून अध्यक्ष बनल्या. अधिसभेत डॉ. उमाकांत राठोड यांनी अपक्ष निवडणूक लढवत बाजी मारली. विद्या परिषदेच्या निवडणुकीत डॉ. राजेश करपे यांनी विक्रमी १४९५ प्राध्यापकांची मते मिळवून तब्बल १ हजार ७५ मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला. डॉ. सर्जेराव जिगे हे मराठी भाषा अभ्यास मंडळाचे कुलगुरू नियुक्त सदस्य बनले, तेथून अध्यक्षही झाले. या महत्त्वाच्या प्राधिकरणांशिवाय डॉ. दीपक भुसारे हे अर्थशास्त्र, डॉ. ज्ञानोबा कसाब मत्स्यशास्त्र आणि डॉ. ज्ञानेश्वर देशमुख हे प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य बनले आहेत. एकाच महाविद्यालयातील तब्बल सात प्राध्यापक व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्यापरिषद, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्याच वेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठ महाविद्यालयांतून फक्त तीन विद्या परिषद, तर एक व्यवस्थापन परिषदेचा सदस्य आहे.
प्राध्यापक संघटनांवरही वर्चस्व
प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांचे विविध प्राध्यापक संघटनांवरही वर्चस्व आहे. भाजप संबंधित विद्यापीठ विकास मंचचे डॉ. सर्जेराव जिगे निमंत्रक आहेत. डॉ. उमाकांत राठोड बामुक्टो संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून, प्रबळ अशा उत्कर्ष ग्रुपचे मागील पाच वर्षांत डॉ. राजेश करपे यांनी व्यवस्थापन परिषदेत नेतृत्व केले आहे.
नेते उदंड; पण पदक एकच
नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या युवा महोत्सवात प्रतिष्ठानच्या संघाला १२२ पारितोषिकांपैकी फक्त वक्तृत्व स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे एकमेव पारितोषिक मिळाले. या महाविद्यालयात तब्बल ३ हजार विद्यार्थी संख्या असून, ३० प्राध्यापक कार्यरत असताना एकच पदक मिळाले, हे विशेष.