सहा राज्यांतील व्यापाऱ्यांचे केंद्र ‘वडोदबाजार’ !
By Admin | Updated: July 1, 2014 01:08 IST2014-07-01T00:53:37+5:302014-07-01T01:08:05+5:30
रऊफ शेख , फुलंब्री वडोदबाजारचा आठवडी बाजार सहा राज्यांतील व्यापारी केंद्र बनला आहे.

सहा राज्यांतील व्यापाऱ्यांचे केंद्र ‘वडोदबाजार’ !
रऊफ शेख , फुलंब्री
वडोदबाजारचा आठवडी बाजार सहा राज्यांतील व्यापारी केंद्र बनला आहे. महिन्याला सुमारे ३२ कोटींचे खरेदी-विक्री व्यवहार होणाऱ्या या बाजाराने ग्रामपंचायतीला ‘लखपती’ करून टाकले आहे.
प्रत्येक सोमवारी हा आठवडी बाजार भरतो. यात प्रामुख्याने जनावरांच्या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बैल, गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. या बाजाराची ख्याती महाराष्ट्रासह कर्नाटक, राज्यस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश येथे पोहोचली आहे. तेथील व्यापारी बैल विक्रीसाठी व शेळ्या खरेदीसाठी येतात.
राज्यातील कोल्हापूर, कराड, सांगली, सातारा, बीड, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, तुळजापूर येथील व्यापारी शेळ्या खरेदीसाठी, तर पुणे, जळगाव, पाचोरा, धरणगाव, शेंदुर्णी, शेगाव, खामगाव, मालेगाव, नाशिक, चाळीसगाव येथील व्यापारी शेळ्या विक्रीसाठी आणतात.
व्यापारी काय म्हणतात?
आठवडी बाजारात सुविधांचा अभाव आहे. येथे व्यापाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, थांबण्यासाठी शेड, पाण्याचे हौद होणे आवश्यक आहे.
- गोविंद पांडे, ठेकेदार
परराज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना थांबण्यासाठी निवासस्थान असणे आवश्यक आहे, तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.
-फजल अहेमद -बंगळुरू (कर्नाटक)
बाजारात सिमेंट रस्ते झाले पाहिजेत, रस्ता रुंदीकरण करण्याची गरज आहे.
-हनिफ कुरेशी, शेंदुरवादा
व्यापाऱ्यांना थांबण्यासाठी यवस्था व्हावी. एवढ्या राज्यांतून व्यापारी येथे येतात, याचा विचार व्हायला पाहिजे.
-नूरखाँ, पिशोर
शेळ्यांसाठी प्रसिद्ध
या आठवडी बाजारात राजस्थानातील काठीवाड जातीची शेळी, उस्मानाबादी शेळी, मध्यप्रदेशमधील देशी शेळी मिळते. बीड येथील शेळ्याचे व्यापारी प्रत्येक आठवड्याला हजारो शेळ्या खरेदी करून थेट चेन्नई येथे नेऊन विकतात. राजस्थानमधील प्रसिद्ध बैलही येथेच मिळतो. दूध उत्पादकांना लागणाऱ्या गायी, म्हशीही सहज उपलब्ध होतात.
उत्पन्नात पुढे; सोयी-सुविधांत मागे
ग्रामपंचायतला या बाजारापासून वर्षाकाठी ६० ते ७० लाखांचे उत्पन्न मिळते. शिवाय इतर बाजार, व्यापारी गाळे यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नात ग्रामपंचायत जिल्ह्यात अग्रेसर असली तरी विकास मात्र असा तसाच आहे. ग्रामस्थांना, व्यापाऱ्यांना सुख-सुविधा नाहीत. बाहेर राज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना साधे गेस्ट हाऊसही नाही. बाजारात पिण्याचे शुद्ध पाणी, जनावरांची निटनेटकी व्यवस्थाही नाही.