दुष्काळाच्या सावटात पोळा साजरा
By Admin | Updated: August 26, 2014 01:53 IST2014-08-26T01:24:57+5:302014-08-26T01:53:14+5:30
औरंगाबाद : शेतात वर्षभर काबाडकष्ट करून राबणाऱ्या सर्जा-राजाला आज शेतकऱ्यांनी सजवून ढोल-ताशांच्या नादात हर्सूल गावात मिरवणूक काढून पोळा सण साजरा करण्यात आला

दुष्काळाच्या सावटात पोळा साजरा
औरंगाबाद : शेतात वर्षभर काबाडकष्ट करून राबणाऱ्या सर्जा-राजाला आज शेतकऱ्यांनी सजवून ढोल-ताशांच्या नादात हर्सूल गावात मिरवणूक काढून पोळा सण साजरा करण्यात आला. पोळा पाहण्यासाठी हर्सूल गावातील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.
शेतकरी ज्या बैलांच्या जोरावर शेतात धान्य पिकवितो त्या बळींची पूजाअर्चा करण्यासाठी श्रावणी अमावास्येला पोळा सण साजरा करण्यात येतो. पोळ्याच्या एक दिवस अगोदर खांदेमळणी करण्यात येते. औरंगाबादसह आज जिल्ह्यात पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात ढोल-ताशात मिरवणूक काढून स्त्रियांनी सर्जा-राजाची मनोभावे पूजा करीत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले.
पावसाअभावी यंदा पिके न आल्याने शेतकरी आर्थिकरीत्या कमालीचा खचला आहे. हर्सूलच्या आसपास असलेल्या गावांमधील शेतकरी दरवर्षी मोठ्या उत्साहात पोळा फोडण्याच्या परंपरेत सहभागी होतात. यंदा तसा उत्साह दिसून आला नाही. पोळ्याचा सण अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात पोळा म्हटले की, पंधरा ते वीस दिवस अगोदर तयारी सुरू होते. बैलांना सजविण्यासाठी साहित्याची खरेदी, मिरवणुका, गड्यांना कपडे घेणे, गोडधोड खाऊ घालणे असे उत्साही वातावरण असते; परंतु यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे पोळा दरवर्षीसारखा साजरा झाला नाही. शेती मशागत अन् बैलजोडी हे पारंपरिक समीकरण असल्यामुळे बैलजोडी नसलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी मातीच्या बैलांची पूजा करून सण साजरा केला.
हर्सूल येथील हनुमान मंदिराच्या परिसरात परिसरातील बैलांनी गर्दी केली होती. विधिवत पूजा केल्यानंतर पोळा फोडण्याचा मान रंगनाथ काकडे यांना मिळाला. यावेळी माजी नगरसेवक पूनम बमणे, रायजी औताडे, अय्युब पटेल, सहायक पोलीस आयुक्त चौघुले यांच्यासह पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.