धन्वंतरीची पूजा करून धनत्रयोदशी साजरी

By Admin | Updated: October 29, 2016 00:51 IST2016-10-29T00:36:11+5:302016-10-29T00:51:56+5:30

औरंगाबाद : शहरवासीयांनी मनोभावे धन्वंतरीची पूजा करून धनत्रयोदशी साजरी केली. या मुहूर्तावर सोन्या-चांदीचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली.

Celebrate Dhanvantari and celebrate Dhanteras | धन्वंतरीची पूजा करून धनत्रयोदशी साजरी

धन्वंतरीची पूजा करून धनत्रयोदशी साजरी


औरंगाबाद : शहरवासीयांनी मनोभावे धन्वंतरीची पूजा करून धनत्रयोदशी साजरी केली. या मुहूर्तावर सोन्या-चांदीचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली.
आश्विन मासातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी सण साजरा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून डॉक्टरांनी धन्वंतरीची पूजा केली. अनेक रुग्णालयांमध्ये धन्वंतरीच्या मूर्तीला फुलांनी सजविण्यात आले होते. याशिवाय घरोघरी धन्वंतरीचे पूजन करण्यात आले.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. शहरातील कासारी बाजार, सराफा बाजार, समर्थनगर, जालनारोड, जवाहर कॉलनी, निरालाबाजार, सिडको-हडको आदी परिसरातील सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली होती. सकाळी सुरू झालेली ग्राहकी रात्री १० वाजेपर्यंत कायम होती. काहींनी शुद्ध सोने खरेदी केले तर काहींनी दागिने खरेदी करणे पसंत केले. व्यापाऱ्यांनी सांगितले की, दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होत आहे. ही संधी साधून अनेकांनी दागिने खरेदी केले. सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले की, शुक्र वारी सोने ३०७०० रुपये प्रती १० गॅ्रम, तर चांदी ४४,००० रुपये किलोने विक्री झाली. दिवसभरात बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या विक्रीत सुमारे १० कोटींहून जास्त उलाढाल झाली. जिल्ह्यातीलच नव्हे तर परजिल्ह्यांतील ग्राहकही शहरात दागिने खरेदीसाठी आले होते. पाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने विक्री होणार असल्याने व्यापाऱ्यांनी पारंपरिक व आधुनिक डिझाईनच्या दागिन्यांचा स्टॉक ठेवला आहे. बाजारात रेडिमेड कपडे खरेदीही जोरात राहिली. साड्यांच्या दुकानांत मध्यरात्री उशिरापर्यंत साड्यांच्या घड्या घालणे सुरू होते.
सध्या बहुतांश दुकानांमध्ये बिलासाठी संगणक वापरल्या जात आहे. यामुळे खतावणीचा वापर कमी झाला आहे. तरीही दिवाळीत पारंपरिक पद्धतीने खतावणी खरेदी केली जाते. शुक्रवारी मुहूर्तावर व्यापाऱ्यांनी खतावणी खरेदी केली. अनेकांनी लक्ष्मीचे छायाचित्र असलेल्या लालरंगाच्या वह्या खरेदी केल्या. याचबरोबर निळ्या व लाल रंगाचे बॉलपेनही खरेदी केले. लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीच्या छायाचित्रांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

Web Title: Celebrate Dhanvantari and celebrate Dhanteras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.