पालिकेसह शाळांवर राहणार ‘सीसीटीव्ही’ची नजर
By Admin | Updated: December 21, 2014 00:07 IST2014-12-20T23:52:36+5:302014-12-21T00:07:58+5:30
उस्मानाबाद : नगर पालिकेच्या कार्यालयासह २६ शाळांच्या प्रवेशद्वारावर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ त्यामुळे नगर पालिकेतील कामचुकार

पालिकेसह शाळांवर राहणार ‘सीसीटीव्ही’ची नजर
उस्मानाबाद : नगर पालिकेच्या कार्यालयासह २६ शाळांच्या प्रवेशद्वारावर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ त्यामुळे नगर पालिकेतील कामचुकार, दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना चाप बसणार असून, शाळेतील हलचालींवरही ‘सीसीटीव्ही’ची नजर राहणार आहे़.
नगर पालिकेतील कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर लक्ष रहावे, सर्वसामान्य नागरिकांना सौदार्ह वागणूक मिळावी यासाठी चालू वर्षाच्या आरंभीच पालिकेने कार्यालयासह शहराच्या काही भागात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता़ सद्यस्थितीत पालिकेने ‘सीसीटीव्ही’ची निविदा मागविली असून, त्यानंतर नगर पालिकेचे कार्यालय आणि २६ शाळांच्या प्रवेशद्वारावर हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ कॅमेरे बसल्यानंतर पालिकेतील कामचुका, दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना चाप बसणार असून, कामकाजानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्यांना अणखीन चांगली वागणूक मिळणार आहे़
दरम्यान, नगर पालिका कार्यालय व शाळांच्या प्रवेशद्वारावर ‘सीसीटीव्ही’कॅमेरे बसविण्याची निविदा मागवून घेण्यात येत आहे़ पालिकेने कौतुकास्पद आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे़ मात्र, हे काम पूर्णत्वास आणताना ‘सीसीटीव्ही’कॅमेऱ्यांचा दर्जा चांगला ठेवण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ शहरातील काही गुन्हेगारी घटनांमध्ये आरोपितांच्या हलचाली कैद झाल्या, मात्र, ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचा दर्जा चांगला नसल्याने चेहरे कैद होवू शकले नाहीत़
दरम्यान, हे प्रकार रोखण्यासाठी व ‘सीसीटीव्ही’चा उद्देश पूर्ण होण्यासाठी दर्जा चांगला रहावा, याकडे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आता नागरिकांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
पालिकेने वाहतूक सिग्नल सुरू करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे़ वाहतूक शाखेचे कर्मचारी पाचही चौकामध्ये थांबून वाहतुकीवर नियंत्रण आणत आहेत़ याच अनुषंगाने शहरातील मुख्य मार्गावर, चौकात व बाजारपेठेच्या ठिकाणी पालिकेने ‘सीसीटीव्ही’कॅमेरे बसविले तर मोठ्या घटनांना चाप बसणार आहे़ शिवाय एखादी घटना घडलीच तर त्याला जबाबदार असणारा ‘सीसीटीव्ही’त कैद होणार आहे़
आर्थिक अडचणीमुळे चौकांना वगळले
४पालिकेचे आर्थिक उत्पन्न पाहता शहरातील मुख्य चौकांमध्ये ‘सीसीटीव्ही’कॅमेरे बसविण्यासाठी मोठी अडचण आहे़ नगर पालिका कार्यालय व नगर पालिकेच्या २६ शाळांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत़ प्रारंभी कार्यालयात ‘सीसीटीव्ही’बसवून कामकाजावर नियंत्रण आणण्यात येणार आहे़ त्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारावर ‘सीसीटीव्ही’कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ भविष्यात शहरातील मुख्य चौकासह बाजारपेठेतही ‘सीसीटीव्ही’कॅमेरे बसविण्याचे नियोजन असल्याचे मुख्याधिकारी शशिमोहन नंदा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़