उस्मानाबाद शहरावर ‘सीसीटीव्ही’ची नजर !
By Admin | Updated: June 22, 2014 00:09 IST2014-06-22T00:03:34+5:302014-06-22T00:09:24+5:30
विजय मुंडे , उस्मानाबाद येथील पालिका कार्यालयातील विविध विभागासह शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़

उस्मानाबाद शहरावर ‘सीसीटीव्ही’ची नजर !
विजय मुंडे , उस्मानाबाद
येथील पालिका कार्यालयातील विविध विभागासह शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ पालिकेच्या या निर्णयामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानीला लगाम लागणार असून, शहरातील विविध घटना, घडामोडीही सीसीटीव्हीत कैद होणार आहेत़
उस्मानाबाद पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मनमानी, दुपारनंतर ओस पडणारे कार्यालये, विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या़ या तक्रारी व इतर कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी पालिका प्रशासनाने पालिकेतील विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे़ याचे नियंत्रण मुख्याधिकारी व अध्यक्षांच्या कार्यालयातून होणार आहे़ यात कार्यालयासह नगररचनाकार, सुवर्णजयंती विभाग, स्टोअररूम, वसुली विभाग, लेखाविभाग, प्रवेशद्वार, कॉरिडोअर आदी विविध विभागात जवळपास १५ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ पालिकेच्या कार्यालयांसह शहरातील शिवाजी चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकासह वर्दळीच्या नऊ ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ शहरातील कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिसांकडून व्हावे, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे़ कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असून, काही दिवसातच विविध विभागांसह शहरातील हालचाली कैद होणार आहेत.
पोलिसांनाही होणार मदत
उस्मानाबाद नगरपालिकेतील अनेक कर्मचारी कार्यालयातून गायब राहतात़ नागरिकांनी अनेकवेळा याबाबत तक्रारी करून, अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केल्यानंतरही संबंधितांचा मुजोरी कारभार सुरूच होता़ मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याने कोणता अधिकारी, कर्मचारी कोणत्या वेळेत गायब होता, हे समोर येणार आहे़ त्यामुळे येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोयही टळणार आहे़
शहरातील वाढत्या चोऱ्या, बँक ग्राहकांची होणारी लूट, अपघातानंतर फरार होणारे वाहन आदी बाबी या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत़ पालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील विविध चौकात, रहदारीच्या, वर्दळीच्या ठिकाणी होणारे गुन्हे आणि त्यातील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांना या कॅमेऱ्यांची मोठी मदत होणार आहे़ यामुळे चोऱ्यांच्या घटनांनाही काहीअंशी लगाम लागणार असल्याचे दिसत आहे़
दर्जेदार कॅमेऱ्यांची गरज
उस्मानाबाद नगरपालिकेकडून कार्यालयासह विविध चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे़ हे कॅमेरे बसवितानाच उत्तम दर्जाचे बसविण्याची गरज आहे़ यापूर्वी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे दर्जेदार नसल्याने एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनाही अडचणी आल्या आहेत़ त्यामुळे गुन्हेच नव्हे, तर इतर बाबींची सुस्पष्ट माहिती मिळविण्यासाठी दर्जेदार कॅमेरे बसविण्याची गरज आहे़
२० लाख रूपये खर्च अपेक्षित
पालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ मात्र, वाढत्या गुन्हेगारी घटनांना रोख लावून शहरातील शांतता कायम राखण्यासाठी शहरातील विविध वर्दळीच्या ठिकाणीही हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ यासाठी साधारणत: २० लाख रूपये खर्च अपेक्षित असून, लवकरच हे कॅमेरे सुरू होणार आहेत़