शालेय खरेदीची पालकांना काळजी
By Admin | Updated: May 23, 2014 01:09 IST2014-05-23T00:46:16+5:302014-05-23T01:09:25+5:30
औरंगाबाद : नवीन शैक्षणिक वर्षाला पुढील महिन्यात सुरुवात होत आहे. शालेय गणवेश, दप्तर हे कमीत कमी वर्षभर टिकावे हीच प्रत्येक पालकाची इच्छा असते.

शालेय खरेदीची पालकांना काळजी
औरंगाबाद : नवीन शैक्षणिक वर्षाला पुढील महिन्यात सुरुवात होत आहे. शालेय गणवेश, दप्तर हे कमीत कमी वर्षभर टिकावे हीच प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्या दृष्टीनेच पालक खरेदीसाठी बाजारात येतात. यासंदर्भात पालकांना शालेय साहित्य घेताना कोणती काळजी घ्यावी, या विषयीची ही माहिती.शाळेतून मिळालेल्या यादीनुसार वह्या खरेदी कराव्यात. वह्या खरेदी करताना मुखपृष्ठासोबत पानांचा दर्जा बघावा. वहीची शिलाई मजबूत झालेली आहे का हे पाहावे. पानावर शाई फुटत नाही ना हे तपासावे. वह्यांची जाडी जास्त असू नये, याची खबरदारी घ्यावी. यंदा शाळेने गणवेशात बदल केला आहे का याची चौकशी करावी. तयार गणवेश खरेदी करताना प्रत्यक्षात पाल्यास न्यावे. अंगावरील कपड्यापेक्षा किंचित मोठ्या आकारातीलच गणवेश घ्यावा. कपडा आकसला तरीही तो पाल्यास फिटिंगला चांगला बसू शकतो. रेडिमेड गणवेश खरेदी करताना प्रथम शिलाई मजबूत आहे का हे पाहावे.चायनामेड दप्तर तकलादू असतात. नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड दप्तर खरेदी करावे. ब्रँडेड दप्तर खरेदीवर वर्षभराची गॅरंटी दिली जाते. नॉयलॉनच्या दप्तराची शिलाई जास्त टिकत नाही. दप्तराच्या ओझ्याने पाठीवर ताण पडू नये, यासाठी पाठीवरील पट्ट्यांना पॅड लावले आहेत का हे पाहावे. चेन खराब झाल्यास बदलून देण्याची बोलीही करून घ्यावी.दप्तराची वरील बाजू खांद्याच्या बरोबरीने सरळ रेषेत असावी. दप्तराचे बेल्टस् खांद्यापेक्षा जास्त रुंद असू नये. दप्तराच्या बेल्टमध्ये कुशन असावेत. एका हाताने बेल्टची लांबी कमी-जास्त करता यावी. दप्तराच्या मागील बाजूस कुशन असावे. म्हणजे पाठीला त्रास होणार नाही. विद्यार्थ्याचे शरीर व दप्तर सरळरेषेत आहे का हे बघावे म्हणजे खांदा व पाठीवरील ताण कमी होईल. शालेय दप्तरांच्या विक्रीत जून महिन्यात सुमारे ५ कोटींपर्यंत उलाढाल होत असते. चायना मटेरियलपासून तयार झालेले दप्तर तकलादू असते, यामुळे मागील वर्षापासून ब्रँडेड दप्तरांनाच मागणी वाढली आहे. चार पैसे जास्त घ्या, पण ब्रँडेड दप्तर द्या, अशी मागणी पालक करीत असल्याची माहिती दप्तराचे विक्रेत्यांनी दिली. काही शाळांनी दप्तरांवर आपले नाव छापून घेतले आहे. सुमारे ४०० ते ३००० रुपयांदरम्यान ब्रँडेड दप्तर विकल्या जात आहे. वह्या खरेदी ब्रँडेड कंपन्यांच्या वह्या, रजिस्टर बाजारात दाखल झाले आहेत. यासंदर्भात एका वह्या विक्रेत्याने सांगितले की, वह्या, पुस्तकांच्या विक्रीत १० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. प्रत्येक विद्यार्थ्यास कमीत कमी एक डझन वह्या खरेदी कराव्याच लागतात. राज्य शासनाच्या वतीने अभ्यासक्रमांची पुस्तके मोफत दिली जातात; पण खाजगी शाळा, खाजगी प्रकाशकांची पुस्तके आणण्यास सांगत असल्याने खाजगी प्रकाशकांनी तयार केलेली अभ्यासक्रमांची पुस्तकेही बाजारात दाखल झाली आहेत. नवा गणवेश पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांनी गणवेश घालून शाळेत यावे, असा शालेय व्यवस्थापनाचा निर्णय असतो. यामुळे पालकही आपल्या पाल्यांना शाळा सुरू होण्याआधीच नवीन गणवेश खरेदी करतात. ‘नवा वर्ग, नवा गणवेश’ या उक्तीप्रमाणे गणवेश खरेदी केला जातो. व्यापार्यांनी सांगितले की, इंग्रजीच नव्हे तर मराठी माध्यमांच्या काही शाळांनी थेट व्यापार्यांनाच आॅर्डर दिल्या असून, वेगवेगळ्या साईजमध्ये गणवेश तयार करून मागविले आहेत. काही शाळा यास अपवाद असून, त्यांनी पालकांना कुठूनही गणवेश खरेदी करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यंदा तीन ते चार शाळांनी आपल्या गणवेशात बदल केला आहे. मात्र, बाकींच्या शाळांनी मागील वर्षीचा गणवेशाचा पॅटर्न ठेवला आहे. गणवेश विक्रीत ६ ते ८ कोटींदरम्यान उलाढाल अपेक्षित आहे.