क्षमता चार प्रवाशांची, बसवितात दहा ते बारा
By Admin | Updated: August 1, 2014 00:28 IST2014-08-01T00:10:44+5:302014-08-01T00:28:36+5:30
परंडा : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहूक जोरात सुरु असून उत्पन्न वाढविण्यासाठी चालकांकडून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु आहे.

क्षमता चार प्रवाशांची, बसवितात दहा ते बारा
परंडा : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहूक जोरात सुरु असून उत्पन्न वाढविण्यासाठी चालकांकडून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. अवैध वाहतुकीमुळे एसटीला फटका बसत आहे. अॅपे रिक्षाची चार प्रवाशांची क्षमता असताना दहा ते बारा प्रवाशी कोंबले जातात. काळीपिवळी जीप आणि खाजगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. या व्यतिरीक्त टमटमद्वारेही मोठया प्रमाणात अवैधरित्या वाहतूक होत आहे. या वाहनांची संख्या इतर वाहनाच्या बरोबरीने आहे. अॅपे रिक्षा शहरापासून १३ कि. मी वरील वारदवाडी पर्यत प्रवाशी वाहतूक करतात. त्यात सोनगिरी, खासगाव, ढगपिंपरी फाटा, बाम्हणगाव, चांदणी या गावांचा समावेश प्रामुख्याने होते. प्रत्येक वाहनांना प्रवासी वाहतूक क्षमता ठरवून देण्यात आली आहे. मात्र, संबंधितांकडून हा नियम कधीही पाळला जात नाही. अॅपे रिक्षाची प्रवासी क्षमता चार इतकी असते. परंतु, या वाहनातून सर्रास १२ ते १३ प्रवासी घेऊन जातात. जीपच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. सात प्रवासी बसविण्याची परवानगी असताना प्रत्येक्ष चौदा ते सोळा प्रवासी बसवून वाहने सुसाट दामटली जातात. हे चित्र विशेषत: बार्शी, सोनारी, आनाळा, खासापुरी, राजुरी, जवळा या आवांना जोडणाऱ्या मार्गावर पहावयास मिळते. गाडीमध्ये जागा नसल्यास अशा वेळी समोरील बाजूस चालकासह चार, चालकाच्या पाठीमागील आसनावर सहा, सर्वात शेवटी आठ, टपावर सहा असे २४ प्रवासीही बसविले जातात. अशावेळी प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते. अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरू असतानाही संबंधित यंत्रणा मात्र, याकडे दुर्लक्ष करीत आहे. पोलिसांचे या वाहनधारकांशी लागेबांधे असल्याचेही बोलले जाते. (वार्ताहर) एसटीला फटका परंडा आगाराच्या बसद्वारे परंडा-बार्शी या मार्गावर सध्या सोळा फेऱ्या केल्या जातात. परंतु, याही बसफेऱ्यांना अवैैध वाहतुकीचा फटका बसत आहे. सर्वाधिक फटका हा सोनारी, आनाळा अंभी, प्राथ्रुड, साकत, पांचपिपंळा, कुभेफळ,जवळा मार्गावरील खासापुरी, राजुरी, करमाळा राज्यमार्गावरील डोमगांव, आवाटी मार्गे करमाळ्याकडे जाणाऱ्या बसेसला बसत आहे. उत्पन्नावर जवळपास ६० टक्के फरक पडत असल्याचे सांगण्यात आले. कुर्डवार्डीकडे जाणाऱ्या मार्गावर सर्वाधिक अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याने परंडा आगाराची एकही बस सुरू नाही. या सर्व बाबींमुळे हे आगार तोट्यात सुरू असल्याने भूम आगाराला जोडण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.