उमेदवारांचा भर नौटंकीवरच !

By Admin | Updated: October 7, 2014 00:15 IST2014-10-07T00:09:52+5:302014-10-07T00:15:44+5:30

उस्मानाबाद : विद्यमान आमदारांनी मागील पाच वर्षात आपल्या मतदारसंघासाठी काय योगदान दिले? कुठल्या योजना खेचून आणल्या, याबाबत मतदारांपुढे ताळेबंद मांडायला हवा.

Candidates filled with gimmick! | उमेदवारांचा भर नौटंकीवरच !

उमेदवारांचा भर नौटंकीवरच !


उस्मानाबाद : विद्यमान आमदारांनी मागील पाच वर्षात आपल्या मतदारसंघासाठी काय योगदान दिले? कुठल्या योजना खेचून आणल्या, याबाबत मतदारांपुढे ताळेबंद मांडायला हवा. तर विरोधी उमेदवारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी काय व कसे उपक्रम राबविणार, हे सांगायला हवे. मात्र, जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्यांऐवजी उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांवरच भर दिला जात असल्याने मतदारांतून नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात यंदा चुरशीचा सामना रंगला आहे. युती आणि आघाडी यावेळी प्रथमच स्वबळ अजमावित असल्याने लढतीमध्ये कमालीची चुरस वाढली आहे. सर्वच पक्षांनी आपल्या स्टार नेत्यांना जाहीर सभांसाठी प्रचारात उतरविल्याचे चित्र असून, प्रचाराची ही रणधुमाळी येणाऱ्या दिवसांत अधिक गतीमान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बहुतांश उमेदवारांनी कॉर्नर सभांसह मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला असून, ग्रामीण भागात जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी, नेत्यांच्या सभा रंगत असल्याचे चित्र आहे. मात्र, या सभांमध्ये विकास कामे, मतदारसंघामध्ये राबविण्याच्या नियोजित योजना यावर बोलून मतदारांना आकृष्ट करण्याऐवजी वैयक्तीक टीका-टिपण्णी करण्यावर भर देत आहेत.
परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी कुठल्या योजना आहेत, त्या कशा राबविणार? दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न करणार? याबरोबरच वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधा कशा पध्दतीने उपलब्ध करून देणार, त्यासाठी काय प्रयत्न केले, हे उमेदवारांनी सांगावे, अशी सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे. मात्र, अनेकजण विकासाचे हे मुद्दे टाळून विरोधी उमेदवारांवर खाजगी टीका करण्यावरच धन्यता मानत आहेत. यामुळे मतदारांचे तात्पुरते मनोरंजन होत असले तरी ठोस मुद्दे हाती लागत नसल्याने कामाचे कोणीच बोलत नाही. मग कोणाच्या पाठिशी रहावे, अशी संभ्रमाची स्थिती सध्या जिल्ह्यातील मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
तुळजापूर येथे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, तर शिवसेनेकडून उध्दव ठाकरे यांच्या जंगी सभा झाल्या आहेत. परंडा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा पालवे, महादेव जानकर, राष्ट्रवादीकडून अजीत पवार यांच्या सभा झाल्या आहेत. यातील बहुतांश सभांमध्ये राष्ट्रीय मुद्यांवरच चर्चा झडल्याचे दिसून येते. अशा स्थितीत जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विकासाचे मुद्दे दुर्लक्षित होत असल्याचे चित्र आहे. याबरोबरच खेड्यापाड्यात स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांच्या छोट्या-मोठ्या सभा होत आहेत. मात्र, तालुका, जिल्हा स्तरावरील हे पुढारीही राष्ट्रीय प्रश्नांवरच भाष्य करताना प्रामुख्याने दिसत आहेत.
दुसऱ्याचे वाकून बघण्यातच धन्यता
४जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण अजूनही कमी आहे. याबरोबरच अनेक शहरांना पाणीटंचाईसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाचा अभाव असून, काहीशी अशीच परिस्थिती शहरी भागातही असल्याने जिल्ह्यातील दहावी-बारावीनंतरचे विद्यार्थी लातूरसह शेजारच्या इतर जिल्ह्यात मोठ्या संख्येने शिक्षणासाठी जातात. उस्मानाबाद एमआयडीसी वगळता इतर शहरात एकही एमआयडीसी समर्थपणे कार्यरत झालेली नाही. अशा स्थितीत हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काय केले, हे न सांगता विरोधी उमेदवाराने काहीही केले नाही, हे सांगण्यातच बहुतांश उमेदवार दंग झाल्याचे चित्र सभांमधून दिसून येत आहे. या प्रकारामुळे सभा, बैठकांसाठी उपस्थित असलेल्यांचे काही काळापुरते मनोरंजन होणार असले तरी निवडणुका होताच पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच गत मतदारसंघाची होण्याची शक्यता असल्याने प्रचारात विकासाच्या मुद्यांवर चर्चा करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून रस्ते, समाजमंदिर, सभामंडप, व्यायामशाळांसह शाळांना संगणक व इतर साहित्याचा पुरवठा करण्याचे काम मागील पाच वर्षात केले आहे. या माध्यमातून विशिष्ट समाज तसेच विशिष्ट वस्तीतील मतदारांना आकृष्ट करण्याचा या लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असला तरी या कामांच्या पुढे कोणीही बोलायला तयार नाही. दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, हक्काचे २५ टीएमसी पाणी, तसेच बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात काय प्रयत्न केले, हे जाहीर सभांतून सांगायला हवे, अशी अपेक्षा मतदारांतून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Candidates filled with gimmick!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.