उमेदवारांनी टाळला अमावस्येचा मुहूर्त
By Admin | Updated: January 28, 2017 00:48 IST2017-01-28T00:47:51+5:302017-01-28T00:48:27+5:30
बीड : पहिल्याच दिवशी जिल्हाभरात एकही उमेदवारी अर्ज आला नाही.

उमेदवारांनी टाळला अमावस्येचा मुहूर्त
बीड : मिनी मंत्रालयाचा रणसंग्राम शुक्रवारपासून सुरू झाला आहे. मात्र, अमावस्येच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असला तरी पहिल्याच दिवशी जिल्हाभरात एकही उमेदवारी अर्ज आला नाही. पुरोगामी म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी अमावस्येचा मुहूर्त टाळणे पसंत केले.
जिल्हा परिषदेच्या ६० गट व पंचायत समितीच्या १२२ गणांमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मागील महिनाभरापासून विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावागावात बैठका, रॅली, कॉर्नर बैठकांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उमेदवारी मिळण्याआधीच संभाव्य उमेदवारांनी गट-गणातील वाड्या - वस्त्या - तांड्यावर संपर्क वाढवून प्रचाराचा धुराळा उडविला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी अशी मुदत आहे. अवघ्या सहा दिवसांची मुदत असतानाही पहिल्याच दिवशी अमावस्या आल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करणे उमेदवारांनी टाळले. तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी सकाळपासूनच यंत्रणा सज्ज होती. मात्र, सर्वच ११ तालुक्यांमध्ये एकही उमेदवारी अर्ज आला नाही. उमेदवार व त्यांचे समर्थक केवळ अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, कागदपत्रांची माहिती जाणून घेत होते. अनेकजण कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत. तथापि, शनिवारपासून अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)