नामनिर्देशनपत्र दाखल करताच सोयगावात उमेदवाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST2020-12-30T04:07:02+5:302020-12-30T04:07:02+5:30

सोयगाव : गाव विकासाचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या एका उमेदवाराचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ...

Candidate dies in Soyagaon while filing nomination papers | नामनिर्देशनपत्र दाखल करताच सोयगावात उमेदवाराचा मृत्यू

नामनिर्देशनपत्र दाखल करताच सोयगावात उमेदवाराचा मृत्यू

सोयगाव : गाव विकासाचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या एका उमेदवाराचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ही घटना सोयगाव तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी घडली. धुडकू शेना सोनवणे (६१, रा. शिंदोळ) असे मयताचे नाव आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात खळबळ उडाली होती.

शिंदोळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भावी उमेदवार म्हणून धुडकू सोनवणे हे मंगळवारी सोयगाव तहसील कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी आले होते. दुपारी त्यांनी अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी प्रभाग क्र. तीनमधून नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यानंतर ते तहसीलसमोर बसले असताना, अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बेशुद्ध होऊन ते खाली कोसळल्यानंतर सोबत असलेल्या कोमल पाटील, मंगेश सोनवणे, भानुदास बोरसे, दीपक तातळे, विनोद भदाणे, विनोद सोनवणे, रमेश तातळे आदींनी तातडीने त्यांना उपचारासाठी सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेने शिंदोळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

चौकट

ध्यास अपुरा

शिंदोळ येथील धुडकू सोनवणे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना गावाचा विकास करण्याचा ध्यास होता. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. मनमिळाऊ स्वभाव असल्याने ते निवडून येतील, अशी सर्वांना खात्री होती. मात्र, नियतीने डाव साधला आणि त्यांच्या स्वप्नांचा पूर्णपणे चुराडा झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली असा परिवार आहे.

छायाचित्र ओळ- मृत उमेदवाराचा फोटो

Web Title: Candidate dies in Soyagaon while filing nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.