ज्यांना कामे दिली त्यांना बोलवा प्रचाराला !
By Admin | Updated: October 3, 2014 23:54 IST2014-10-03T23:54:01+5:302014-10-03T23:54:01+5:30
बीड : मागील पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आणि खर्च केला

ज्यांना कामे दिली त्यांना बोलवा प्रचाराला !
बीड : मागील पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आणि खर्च केला. या निधीला सुरुंग लावण्याचे काम मोठमोठ्या गुत्तेदारांनी केले. सर्वसामान्य व दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कामे मिळालीच नाहीत. आता प्रचारासाठी नेत्यांकडून दुसऱ्या फळीतील उमेदवारांना निमंत्रण येत आहे, मात्र कार्यकर्ते म्हणतात की, ‘ज्यांना कामे दिले त्यांनाच बोलवा आता प्रचाराला’ या स्थितीमुळे उमेदवार गोंधळले आहेत.
विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. निवडणूक आणि प्रचार म्हटलं की, कार्यकर्त्यांची गर्दी आलीच. ही गर्दी जमविण्यासाठी उमेदवारांचे बगलबच्चे मोठा आटापिटा करीत आहेत. गावच्या सरपंचापासून ते पं.स. सदस्य, जि.प. सदस्य इथपर्यंत सगळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते जमविण्याचे काम सुरू आहे. मात्र या कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक सूर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी मुंबई, पुण्यावरुन गुत्तेदार आयात केले असल्याने छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना साधा गावातील रस्ताही मागच्या पाच वर्षांत मिळाला नाही. कोट्यवधीच्या निधीला बाहेरच्या गुत्तेदारांनी सुरुंग लावला. अशी स्थिती जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात कमी, जास्त प्रमाणात पहावयास मिळते. सध्या प्रचार सुरू झाला असल्याने ज्या गावांमधील ग्रामपंचायत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ताब्यात आहे. त्यांना प्रचारासाठी बोलावले जात आहे.
मात्र त्या कार्यकर्त्यांमध्ये संबंधित उमेदवाराविषयी रोष असल्याचे पहावयास मिळते. काही कार्यकर्ते तर म्हणतात की, ‘ज्यांना मागील पाच वर्षांत गुत्तेदाऱ्या दिल्या त्यांनाच आता प्रचाराला बोलवा’, असे खडे बोल कार्यकर्त्यांकडून ऐकविले जात असल्यामुळे उमेदवारांना त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचे काम करावे लागत आहे.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आला, खर्चही झाला. मात्र या विकास कामांचे गुत्ते कोणाला दिले? यावरुन कार्यकर्ते खल घालत आहेत. ज्या छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला नेत्यांनी विकास कामांचे ठेके दिले. त्यांनी बहुतांश ठिकाणी निकृष्ट कामे केली असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे सुरू असलेल्या प्रचार रणधुमाळीत सर्वसामान्य कार्यकर्ते उतरतील का? उतरले तर मनातून काम करतील का? याबाबत सर्वच पक्षातील उमेदवारांना संभ्रम वाटत आहे. (प्रतिनिधी)