सीए परीक्षेचा निकाल जाहीर
By Admin | Updated: January 17, 2016 23:54 IST2016-01-17T23:50:43+5:302016-01-17T23:54:24+5:30
औरंगाबाद : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाच्या वतीने नोव्हेंबर २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला.

सीए परीक्षेचा निकाल जाहीर
औरंगाबाद : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाच्या वतीने नोव्हेंबर २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला.
चार्टर्ड अकाऊंटंटच्या अंतिम परीक्षेसाठी शहरातून सुमारे ४२७ विद्यार्थी बसले होते. त्यात ९ विद्यार्थी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले, तर ‘ग्रुप वन’मध्ये २७ विद्यार्थी आणि ‘ग्रुप टू’मध्ये २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. असे एकूण ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुपारी २ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला. हजारो विद्यार्थ्यांमधून बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात. यावरून ही परीक्षा किती कठीण आहे, याचा अंदाज येऊ शकतो. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जगात कुठेही चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून काम करू शकतात, एवढी ‘ब्रँड व्हॅल्यू’ या कोर्सला आहे. प्रथम प्रयत्नात पास झालेले ९ यशवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे : आदित्य मालपाणी, जित शहा, मोहिनी मालपाणी, पूजा शर्मा, शुभम् मालानी, व्यंकटेश साबू, करिश्मा पहाडे, नेहा मानधने व सौरभ खटोड, असे आयसीएआय औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष पंकज कलंत्री यांनी सांगितले.
चार्टर्ड अकाऊंटंटच्या अंतिम परीक्षेच्या निकालासोबतच आज सीए सीपीटी प्रवेश परीक्षा कॉमन प्रोफेशियन्सी टेस्टचा निकाल जाहीर झाला. ही परीक्षा शहरातून १ हजार विद्यार्थ्यांनी दिली होती. यातील १९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
अंतिम परीक्षा पास होऊन चार्टर्ड अकाऊंटंट बनलेल्या व्यंकटेश साबू या विद्यार्थ्याने सांगितले की, माझे वडील काही कारणास्तव सीए होऊ शकले नव्हते; पण आपली दोन्ही मुले सीए बनावीत, ही त्यांची इच्छा होती.
माझा मोठा भाऊ वेणूगोपाल साबू सीए झाला. त्याच्यानंतर आज मी सीएची परीक्षा पास झालो आहे. आम्ही वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आता नोकरी करण्यापेक्षा मी सीएची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू करणार आहे, तसेच सीएच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचाही माझा विचार आहे.