पोटनिवडणुकीत चौरंगी लढत
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:17:00+5:302014-06-14T01:20:23+5:30
लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ अ च्या जागेसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरु आहे़ शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती़ या मुदतीत ५ जणांनी माघार घेतली

पोटनिवडणुकीत चौरंगी लढत
लातूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ अ च्या जागेसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरु आहे़ शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती़ या मुदतीत ५ जणांनी माघार घेतली असून, आता रिंगणात काँग्रेससह तीन अपक्ष राहिले आहेत़ मनपात एंट्रीसाठी उत्सुक असेली भाजपा ‘हिट विकेट’ झाल्याने काँग्रेसला आता अपक्षांशीच टक्कर द्यावी लागणार आहे़
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक १३ अ च्या जागेसाठी आता चौघेच उमेदवारी रिंगणात राहिले आहेत़ शुक्रवारी शेवटच्या दिवशी ५ जणांनी माघार घेतली़ त्यात मागील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहिलेले जितेंद्र कांबळे यांचाही समावेश आहे़ याशिवाय, नितिश वाघमारे, बालाजी शिंदे, अर्चना आल्टे, दत्तू आल्टे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे़ त्यामुळे आता काँग्रेसच्या प्रफुल्ल कांबळे यांची लढत विजय अजनीकर, विठ्ठल भोसले व शिवप्रसाद श्रृंगारे यांच्याशी होणार आहे़
उमेदवारांच्या अर्ज छाननीत नाट्यमयरित्या भाजपाला झटका बसला होता़ अपत्यांच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केली नसल्याने भाजपाचे अधिकृत उमेदवार तुषार कांबळे यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपा लढतीपूर्वीच ‘हिट विकेट’ झाली़ त्यामुळे भाजपाकडून शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुक राहिलेल्या नितीश वाघमारे यांच्या पाठिशी भाजपा बळ देईल, अशी चर्चा केली जात असतानाच शुक्रवारी नितीश वाघमारे यांनी अर्ज मागे घेत आणखी एक धक्का दिला़ त्यातच मागील वेळी भाजपाचे उमेदवार राहिलेल्या जितेंद्र कांबळे यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे़ दरम्यान, काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहणार असून सध्याच्या उमेदवारांपैकी जो चांगली लढत देऊ शकेल, त्यास भाजपाचा पाठिंबा राहणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष सुधीर धुतेकर यांनी सांगितले़
दरम्यान, लढतीत राहिलेले अपक्ष विजय अजनीकर हे मागील निवडणुकीतही उमेदवार होते़ त्यांनी बसपाकडून निवडणूक लढविली होती़ जवळपास साडे नऊशे मत घेऊन ते दुसऱ्या स्थानी राहिले होते़ मात्र यावेळी बसपाने त्यांना एबी फॉर्म दिला नाही़ परंतु, त्यांच्या पाठिशी बळ उभे करण्याचे सूतोवाच केले आहे़ दरम्यान, या जागेवर निवडून आलेले अॅड़व्यंकट बेद्रे यांच्याविरुद्ध न्यायालयीन लढाई लढून त्यांचे पद रिक्त करण्यात मोठा वाटा उचललेले शिवप्रसाद श्रृंगारेही लढतीत कायम राहिले आहेत़ मोगील वेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावरुन लढले होते़ यावेळी पदवीधरच्या निवडणुकीमुळे उमेदवार न देण्याचा निर्णय राकाँने घेतल्याने श्रृंगारे यांना अपक्ष म्हणून लढावे लागत आहे़ दरम्यान, विठ्ठल भोसले हेही अपक्ष म्हणून रिंगणात राहिले आहेत़ (प्रतिनिधी)