‘बुट्टेनाथ’चे काम रखडले शहरासमोर पाणीसंकट

By Admin | Updated: April 15, 2016 00:37 IST2016-04-15T00:05:38+5:302016-04-15T00:37:41+5:30

अंबाजोगाई : शहराला सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या टंचाईला तोंड देण्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलाव निर्मिती हा सक्षम पर्याय ठरेल.

'Buttnath' work is in progress in front of the city | ‘बुट्टेनाथ’चे काम रखडले शहरासमोर पाणीसंकट

‘बुट्टेनाथ’चे काम रखडले शहरासमोर पाणीसंकट

अंबाजोगाई : शहराला सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या टंचाईला तोंड देण्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलाव निर्मिती हा सक्षम पर्याय ठरेल. मात्र पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नसल्यासह इतर तांत्रिक कारणांमुळे तब्बल दहा वर्षांपासून सदरील तलावाचे काम रखडले आहे. आता काम सुरु केल्यास ते लवकर पूर्णत्वास लागेल, असा कयास अंबाजोगाईकरांचा आहे.
शहराला गेल्या पंधरा वर्षांपासून पाणीटंचाई तीव्रतेने भेडसावत आहे. मांजरा धरणाचा पर्याय सोडला तर वर्षभर अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा होईल असा एकही पर्यायी तलाव तालुका व परिसरात उपलब्ध नाही. जे आहेत त्यांची पाण्याची साठवण क्षमता अत्यल्प असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न भविष्यातही तीव्रतेने भेडसावणारा आहे. या टंचाई निवारणासाठी बुट्टेनाथ साठवण तलावाची निर्मिती सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी या तलावाचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला. जलसंपदा विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला एप्रिल २०१३ मध्ये तत्वत: मान्यता मिळाली असून या साठवण तलावाच्या कामासाठी सर्व्हे, स्थळ पाहणी व प्रकल्प प्रस्ताव पाठविण्यासाठी २५ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली होती. मात्र, हा निधी प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारात अडकून राहिला. अंबाजोगाई शहराला १.५० लाख लोकसंख्या गृहित धरून व सिंचन क्षेत्र ३६.२५ हेक्टर गृहित धरून १४.५० दलघमी पाणी क्षमता असलेला हा तलाव निर्माण झाला तर अंबाजोगाई शहराचा पाणीप्रश्न सहज सुटेल मात्र, या तलावाच्या कामाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.
मंजुरी उपलब्ध करण्यासाठी नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या वतीने पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळणे ही प्रक्रिया तांत्रिक बाबीत अडकल्याने या तलावाचे भवितव्य धोक्यात आहे. या तलावापासून नागापूर धरण जवळ असल्याने व हा परिसर नागापूर धरणाच्या कार्यक्षेत्रात असल्याने या तलावाची निर्मिती स्वप्न ठरते की काय? अशीच अवस्था प्रशासकीय कारभारातून समोर आली आहे.
अंबाजोगाई शहरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून बुट्टेनाथ साठवण तलावाची निर्मिती म्हणून पाहिले जाते. (वार्ताहर)
पाणी संकट वर्षागणिक बिकट बनत चालले आहे. त्यामुळे पर्यायी उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
आजच्या किंमतीनुसार प्रोजेक्ट मंजूर झाल्यास तो कमी किंमतीत पूर्ण होऊ शकते, परंतु दोन-तीन वर्षांत बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्यानंतर काम पुन्हा निधी अभावी रखडू शकते.

Web Title: 'Buttnath' work is in progress in front of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.