जळकोटला टंचाईच्या झळा
By Admin | Updated: August 23, 2015 23:46 IST2015-08-23T23:39:45+5:302015-08-23T23:46:57+5:30
जळकोट शहर व तालुक्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने भर पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला

जळकोटला टंचाईच्या झळा
जळकोट शहर व तालुक्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने भर पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे़ तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ गेल्या चार दिवसापासून जळकोट शहरातील तीनही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद झाल्याने पाणीटंचाईत भर पडली असून, प्रशासनाच्या नियोजनाअभावी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना सहन करावा लागत आहे़
तालुक्यात सध्या दोन टँकर व २२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, तो अपुरा पडत आहे़ तालुक्यातील जळकोट मंडळात ३३३ मिलीमीटर तर घोणशी मंडळात २३९ मि़मी़ पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे़ तालुक्यातील ढोरसांगवी, जंगमवाडी, सोनवळा करंजी, वांजरवाडा, चेरा, गुत्ती, गुत्ती २, माळहिप्परगा, धोंडवाडी, शेलदरा, डोमगाव आदी साठवण तलावात जलसाठा अद्यापही जोत्याखाली आहे़ तर हळदवाढवणा धरणातील पाणीसाठाही अत्यल्प आहे़ तालुक्यात शंभराहून अधिक पाझर तलाव आहेत, तेही कोरडेच़
तिरू नदी ही कोरडीच असून, नदीकाठी जनावरांचे कळप पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे दिसून येत आहे़ रावणकोळा धरणात पूर्वीचा बऱ्यापैकी जलसाठा उपलब्ध आहे़ त्या धरणातूनच माळहिप्परगा, रावणकोळा परिसरातील वाडी-तांडे व जळकोट शहरातील नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू केला आहे़ त्यातही नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे़ जळकोट शहराला धरणातून पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन त्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता, संबंधित जिल्हा परिषद सदस्य व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत चाचणीही घेण्यात आली़ मात्र पणी जळकोटच्या टाकीत येऊन पोहोचले़ सहा ते सात मोटारी चालल्या़ परंतू, नगरपंचायतीने ही योजना अद्यापही आपल्या ताब्यात घेतली नाही़ सदरील योजनेअंतर्गत मिळणारे पाणी अद्यापही कुलूपबंद प्रक्रियेतच आहेत़ दोन-तीन दिवसापूर्वी शहरात पाणीपुरवठा करण्यात आला होता़ परंतू, सदरील योजना नगरपंचायतीने ताब्यात न घेतल्याने पुन्हा ग्रामस्थांना पणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़
पंचायत समिती व तहसील प्रशासनाने टँकर बंद केले़ तसेच नळ योजनेचे पाणीही बंद केले़ त्यामुळे शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे़ त्यामुळे नगरपंचायतीने ही योजना तात्काळ ताब्यात घेऊन पाणीपुरवठा सुरळीत ठेवल्यास नागरिकांना पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांची आहे़
सदरील योजनेअंतर्गत शहराला पुरवठा करण्यात येणारे पाणी दर पंधरा दिवसाला सुटत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे़ तालुक्यातील उमरदरा, शिवाजीनगर तांडा, फकू्र तांडा या तीन तांड्यावर एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ तर अनेक वाडी-तांड्यावरील जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पशुधनांच्या चाऱ्या-पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़ या उमरदरा या गावालाही तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करूनही पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ नगरपंचायतीने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे़