ईटकळमध्ये पुन्हा घरफोडी
By Admin | Updated: May 30, 2017 00:27 IST2017-05-30T00:24:16+5:302017-05-30T00:27:18+5:30
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील ईटकळ येथे शुक्रवारपाठोपाठ रविवारी पुन्हा घरफोडीची घटना घडली.

ईटकळमध्ये पुन्हा घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील ईटकळ येथे शुक्रवारपाठोपाठ रविवारी पुन्हा घरफोडीची घटना घडली. विशेष म्हणजे, शुक्रवारी महामार्गालगत तर रविवारी पोलीस चौकीपासून जवळच असलेल्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी रात्री राष्ट्रीय महामार्गालगत असलेली दोन घरे फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने असा जवळपास दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. यापाठोपाठ रविवारी रात्री पोलीस चौकीच्या पाठीमागे काही अंतरावर आसलेले सूरज महाबोले यांच्या बंद घराचे कुलुप तोडून पेटीमधील नवीन साड्या, कपडे व चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. यापाठोपाठ जिब्राईल मुजावर यांच्या घराकडे आपला मोर्चा वळविला. येथे घरासमोर झोपलेल्या मुलाने त्यांना हाटकल्यामुळे चोरट्यांनी दगड भिरकावले. यामुळे गोंधळ निर्माण होताच आंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे गोंधळ निर्माण झाल्याने गावामधील तरुण व पोलिसांनी परिसर पिंजून काढला. परंतु कुठलेच धागे हाती लागले नाहीत. सोमवारी झालेल्या चोरीची फिर्याद न दिल्याने आद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.