उमरग्यात घरफोडी; दागिने, रक्कम लंपास
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T00:14:15+5:302014-06-14T01:20:23+5:30
उमरगा : घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवून रोख साडेतीन लाख रूपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडेपाच लाख रूपयांचा
उमरग्यात घरफोडी; दागिने, रक्कम लंपास
उमरगा : घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवून रोख साडेतीन लाख रूपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडेपाच लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरूवारी रात्री शहरातील दर्गाह गल्ली जुनी पेठ भागात घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील आरटीओ एजंट म्हणून कार्यरत असलेले महंमद मुसा अब्दूल मज्जीद काझी ऊर्फ जॅकी काझी हे येथील दर्गाह गल्ली जुनी पेठ भागात वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास काझी हे घराचा दरवाजा पुढे करून बाहेर गेले होते. चहा पिऊन घरी येईपर्यंत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडून आतील रोख साडेतीन लाख रूपये, सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या असे १ लाख ९५ हजारांचे दागिने असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
काझी हे घरी परत आल्यानंतर त्यांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनीही चोरट्यांची शोधाशोध केली. मात्र, हे प्रयत्न व्यर्थ गेले. याप्रकरणी जॅकी काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विश्वजीत कासले करीत आहेत. (वार्ताहर)