मास्क न वापरल्यास घराच्या उताऱ्यावर बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:05 IST2021-03-23T04:05:42+5:302021-03-23T04:05:42+5:30
सोयगाव : गावभर विनामास्क फिरणाऱ्यांनो, सावधान व्हा. कारण यापुढे विनामास्क आढळून आला, तर घराच्या नमुना नंबर आठवर पाचशे रुपयांचा ...

मास्क न वापरल्यास घराच्या उताऱ्यावर बोजा
सोयगाव : गावभर विनामास्क फिरणाऱ्यांनो, सावधान व्हा. कारण यापुढे विनामास्क आढळून आला, तर घराच्या नमुना नंबर आठवर पाचशे रुपयांचा बोजा टाकण्याचा निर्णय घोसला ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयाचे ग्रामस्थांनीही स्वागत केल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी घोसला ग्रामपंचायतीच्या या पुढाकाराची तालुक्यात चर्चा रंगली आहे.
सोयगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. काही दिवसांत तालुक्यात चाळीस जणांना कोरोनाची लागण झाली. आरोग्य यंत्रणा वगळता प्रशासनाच्या कोणत्याही यंत्रणा जनजागृती करताना आढळून येत नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा भार एकट्या आरोग्य यंत्रणेवर येऊन पडला. त्यातच कोरोनाला गावाच्या वेशीबाहेर रोखण्यासाठी घोसला ग्रामपंचायतीने अनोखा निर्णय घेतला. सरपंच सुवर्णाबाई वाघ यांनी पुढाकार घेत, मास्कचा वापर बंधनकारक करण्यासाठी दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला, तर विनामास्क फिरणाऱ्यांच्या घरावरील नमुना नंबर आठ वर पाचशे रुपयांचा बोजा आकारणार असल्याचा निर्णय ग्रा.पं. बैठकीत घेण्यात आला.
---
जरंडी ग्रामपंचायातही सतर्क
तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतही सतर्क झाली आहे. मास्कचा वापरणे बंधनकारक केले असून, विनामास्क फिरताना आढळून आल्यास शंभर रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.