‘आपत्ती’चा भार एकाच कर्मचाऱ्यावर !
By Admin | Updated: September 8, 2014 00:55 IST2014-09-08T00:24:47+5:302014-09-08T00:55:10+5:30
शिरुर अनंतपाळ : कुठलीही आपत्ती कोसळल्यानंतर त्यातून तात्काळ सुखरुप मुक्तता व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यरत आहे़

‘आपत्ती’चा भार एकाच कर्मचाऱ्यावर !
शिरुर अनंतपाळ : कुठलीही आपत्ती कोसळल्यानंतर त्यातून तात्काळ सुखरुप मुक्तता व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यरत आहे़ परंतु, शिरुर अनंतपाळ येथील आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा केवळ एकाच कर्मचाऱ्यावर आहे़ विशेष म्हणजे या कक्षात अद्ययावत सुविधाही उपलब्ध नसल्याचे पहावयास मिळत आहे़ त्यामुळे दुर्देवाने एखादी आपत्ती कोसळल्यानंतर तिचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनची कसोटीच ठरणार आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्याला घरणी नदीचा बारा किमीचा तर मांजरा नदीचा तेरा किमीचा किनारा लाभला आहे़ शिवाय काही गावे डोंगराच्या कुशीत वसली आहेत़ या नदीकाठच्या अन् डोंगर कुशीतील गावांना केव्हाही नैसर्गिक आपत्तीचा फटका बसण्याची भिती नाकारता येत नाही़
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील फ्रकानपूर, वांजरखेडा, डोंगरगाव, हालकी, उजेड, बिबराळ, बाकली, सांगवी-घुग्गी, साकोळ आदी गावांना मांजरा नदीचा तेरा किमीचा तर घरणी नदी किनारी लक्कड जवळगा, दगडवाडी, जोगाळा, शिरुर अनंतपाळ, अजनी, राणी अंकुलगा, साकोळ आदी गावे वसली आहेत़ या शिवाय आरी, सय्यद अंकुलगा, हालकी आदी गावे डोंगरच्या कुशीत वसली आहेत़ तालुक्यातील बहुतांशी गावांवर केव्हाही नैसर्गिक आपत्ती कोसळण्याची भिती नाकारता येत नाही़ आपत्ती कोसळल्यानंतर नागरिकांची सुखरूप सुटका होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष अद्यावत असणे गरजेचे आहे़ परंतु, येथील तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षात केवळ एका लिपिकाची नेमणूक करण्यात आली आहे़ केवळ एका कर्मचाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापनचा भार आहे़(वार्ताहर)