कॉपी बहाद्दरांविरुद्ध कारवाईचा दणका
By Admin | Updated: November 5, 2014 00:59 IST2014-11-05T00:48:31+5:302014-11-05T00:59:49+5:30
औरंगाबाद : पदवी परीक्षेत आतापर्यंत ५० ते ६० कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि सह केंद्रप्रमुखांची नजर आहे

कॉपी बहाद्दरांविरुद्ध कारवाईचा दणका
औरंगाबाद : पदवी परीक्षेत आतापर्यंत ५० ते ६० कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि सह केंद्रप्रमुखांची नजर आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली.
विद्यापीठामार्फत २९ आॅक्टोबरपासून पदवी परीक्षेला प्रारंभ झाला. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील २३० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली असून या सर्व केंद्रांसाठी विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून सह केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, २० ते २५ सह केंद्रप्रमुख नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रांवर गेलेच नाहीत.
यासंदर्भात विद्यापीठाने चौकशी केली असता काही जणांना नियुक्तीचे आदेश पोहोचले नाहीत, तर काहींना प्राचार्यांनी परीक्षेच्या कामासाठी कार्यमुक्त केले नाही. परीक्षेच्या कामासाठी सहकार्य न करणाऱ्या प्राचार्यांविरुद्ध विद्यापीठामार्फत कारवाई केली जाणार आहे. जेथे सह केंद्रप्रमुख पोहोचू शकले नाहीत, त्या केंद्रांवर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे.
परीक्षेच्या या चार दिवसांच्या कालावधीत गंगापूर, जालना, गेवराई, बीड या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉपी करताना सह केंद्रप्रमुख, भरारी पथकांतील सदस्य आणि काही ठिकाणी प्राचार्यांनी पकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
सर्वच केंद्रांवर कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाची सर्व यंत्रणा अलर्ट असून जो विद्यार्थी कॉपी करताना पकडला जाईल, त्याचा संपूर्ण वर्षाचा ‘परफॉर्मन्स’ रद्द करण्याच्या निर्णयावर विद्यापीठ प्रशासन ठाम आहे. दरम्यान, १०- १५ केंद्रे वगळली, तर उर्वरित सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीत असल्याचे डॉ. गायकवाड म्हणाले.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये कॉपीमुक्ती परीक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे सर्व प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना उद्या पत्र लिहिणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉपीमुक्ती अभियान महत्त्वाचे आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांशिवाय प्राचार्य आणि शिक्षकांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, याचा उलगडा कुलगुरू हे त्या पत्राद्वारे करणार आहेत.