अर्थसंकल्पात १०२ कोटींची वाढ
By Admin | Updated: March 29, 2016 00:54 IST2016-03-29T00:11:10+5:302016-03-29T00:54:03+5:30
औरंगाबाद : मनपा प्रशासनाने मागील आठवड्यात स्थायी समितीला वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये स्थायी समितीने तब्बल १०२ कोटी रुपयांची वाढ सुचविली असून

अर्थसंकल्पात १०२ कोटींची वाढ
औरंगाबाद : मनपा प्रशासनाने मागील आठवड्यात स्थायी समितीला वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये स्थायी समितीने तब्बल १०२ कोटी रुपयांची वाढ सुचविली असून, आता अर्थसंकल्प ८७८ कोटी २४ लाखांपर्यंत पोहोचला आहे. शहरात विविध विकासकामांसाठी २६० कोटी रुपये आहेत. समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प लवकरच सर्वसाधारण सभेला सादर करण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी स्थायी समितीची तहकूब बैठक घेण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी नेहमीप्रमाणे प्रशासनावर जोरदार आगपाखड केली. मागील वर्षी ८०० ते ९०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला. त्यातील एकही काम झाले नाही. यंदाही प्रत्येक वॉर्डाला ४५ ते ५० लाखांपर्यंतचीच कामे देण्यात आली आहेत. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी प्रशासनातर्फे बाजू मांडताना सांगितले की, यंदा मालमत्ता कर व इतर वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध होईल. वेळप्रसंगी आम्ही काही कामे खाजगीकरणाच्या माध्यमातूनही करणार आहोत. या खुशीवरही नगरसेवकांचे ‘समाधान’ झाले नाही. यंदा अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेली कामे झालीच पाहिजेत, असा आग्रह नगरसेवकांनी धरला. सभापती दिलीप थोरात यांनी होकार दर्शवून कामे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मागील वर्षी न झालेली कामे आणि नवीन कामे यंदा अर्थसंकल्पात आहेत. या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीही विविध विकासकामे त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे थोरात यांनी नमूद केले. नगररचना विभागाकडे आजपर्यंत मनपाने दुर्लक्ष केले. या विभागाला २०० कोटींचे उद्दिष्ट द्यायला हवे. बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, रेखांकन आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वसुली होऊ शकते, असे मत नगरसेवक चित्ते यांनी व्यक्त केले.