भविष्याचा वेध घेणारा ‘बुद्धिस्ट फेस्टिव्हल’

By Admin | Updated: October 16, 2016 01:14 IST2016-10-16T00:54:15+5:302016-10-16T01:14:23+5:30

काल औरंगाबादेत झालेला बुद्धिस्ट फेस्टिव्हल हा केवळ सोहळा नव्हता. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून बौद्ध तरुणांना दिशा देण्याचा प्रयत्न झाला.

The 'Buddhist Festival' that looks at the future | भविष्याचा वेध घेणारा ‘बुद्धिस्ट फेस्टिव्हल’

भविष्याचा वेध घेणारा ‘बुद्धिस्ट फेस्टिव्हल’


काल औरंगाबादेत झालेला बुद्धिस्ट फेस्टिव्हल हा केवळ सोहळा नव्हता. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून बौद्ध तरुणांना दिशा देण्याचा प्रयत्न झाला. फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक भदन्त धम्मज्योती थेरो यांनी कालच्या फेस्टिव्हलमध्ये आवाहन केले की, जगातील बौद्ध राष्ट्रांनी भारतातील बौद्धांसोबत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यापारविषयक संबंध दृढ करावेत. भारत ही बुद्धांची भूमी म्हणून तुम्ही आमच्याकडे आदराने बघता, मग भारतातील बौद्ध तरुणांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकस्तर उंचावण्यासाठी मैत्रीचे हात पुढे करा. भारतीय बौद्ध तरुणांमध्ये विद्वता व कौशल्य आहे. मात्र, ती अधिक वृद्धिंगत करण्याची गरज आहे. त्यासाठी जगातील बौद्ध राष्ट्रांनी भारतातील उच्चशिक्षित, व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना कौशल्य विकास व व्यावसायिक उच्च तंत्रज्ञान शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव कालच्या फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध प्रतिनिधी व भिक्खूंसमोर ठेवण्यात आला. तो एकमताने सर्वांनीच मान्य केला. मराठवाड्याला मोठी बौद्ध परंपरा लाभलेली आहे. नालंदा, तक्षशीला या आंतरराष्ट्रीय बौद्ध विद्यापीठांप्रमाणे येथेही पूर्वी अजिंठा विद्यापीठ होते. याच परिसरात अजिंठा, वेरूळ, पितळखोरा येथे बौद्ध शिल्पे आहेत. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथे स्वतंत्र पाली विद्यापीठ व्हावे, हा प्रस्तावही ठेवण्यात आला. त्यावर निश्चित विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विदेशी बौद्ध राष्ट्रांमध्ये ज्ञानाची, तंत्रज्ञानाची आदानप्रदान झाल्यास भारतीय बौद्ध तरुणांचे भवितव्य उज्ज्वल असेल, या विश्वासाने फेस्टिव्हलचे संयोजक भदन्त धम्मज्योती थेरो यांनी या प्रस्तावाला मूळ स्वरूप देण्यासाठी लवकरच इंटरनॅशनल बुद्धिस्ट आॅर्गनायझेशन स्थापन केली जाणार असून त्याचे हेडक्वॉर्टर हे महाराष्ट्र असेल, यावरही कालच्या फेस्टिव्हलमध्ये शिक्कामोर्तब केले. वर्षभराच्या आत हे आॅर्गनायझेशन स्थापन होईल. त्यानंतर या आॅर्गनायझेशनच्या कार्यकारिणीची पहिली सभा महाराष्ट्रात होईल. त्यानंतर दरवर्षी वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये या आॅर्गनायझेशनच्या बैठका घेतल्या जातील. त्यात प्रामुख्याने भारतीय बौद्ध तरुणांच्या शैक्षणिक व व्यापारविषयक आदान-प्रदानतेबद्दल चर्चा होईल.
बुद्धभूमी म्हणून जगातील सर्वच देश भारताकडे बघतात. तथागत गौतम बुद्धांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, त्याग व शांतीचा विचार हाच जगाला तारू शकतो, हे सर्वांनीच मान्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावर केलेले कालचे भाषण सर्वांची मने जिंकून गेले. २१ व्या शतकातही दलित-दलितेतर संघर्ष पाहायला मिळतो, ही बाब या देशाची मान शरमेने खाली घालणारी आहे. कोपर्डी, नाशिक येथील घटनांचा नामोल्लेख टाळून देवेंद्र फडणवीस, समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले, केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी केलेले भाषण दिलासा देणारे ठरले. मागण्या करणे,आंदोलने करणे हा सर्वांचा अधिकार आहे; पण यासाठी दुसऱ्या समाजाला ‘टार्गेट’ करणे, हे कदापीही सहन केले जाणार, हा संदेशही खूप काही सांगून गेला; पण आजही ग्रामीण भागात दलितांमध्ये केवळ बौद्धांनाच ‘टार्गेट’ केले जाते, त्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे भूमिका घेणार आहेत का, हा या फेस्टिव्हलमध्ये व्यक्त झालेला प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक आपल्या अनुयायांमध्ये पेरलेल्या एकीच्या विचारवृक्षाला जयंती समारंभ, महापरिनिर्वाण दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सवामध्ये बेकीची फळे कशी लागतात, हे आणखी नव्याने सांगण्याची गरज नाही. काल औरंगाबादेत झालेल्या ‘इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल’च्या आदल्या दिवसापर्यंत येथील आंबेडकरी अनुयायांमध्ये साशंकता होती; पण काल त्या फेस्टिव्हलने सर्वांना चकित केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन, बौद्ध उपासक, उपासिकांनी बाळगलेली कमालीची शिस्त, बौद्ध भिक्खू आणि प्रमुख पाहुण्यांची देखणी आसन व्यवस्था, बीड बायपासलगत जबिंदा लॉन्स शेजारच्या मैदानावर उभारलेला विशाल सभामंडप, श्रीलंका, कोरिया, जपान, थायलंड, व्हिएतनाम, तिबेट या बौद्ध राष्ट्रांतून आलेले प्रतिनिधी व भिक्खूंचे आदरातिथ्य सारेच वाखाणण्याजोगे होते. हा फेस्टिव्हल भविष्याचा वेध घेणारा ठरेल, हे मात्र नक्की!

Web Title: The 'Buddhist Festival' that looks at the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.