'बुद्धांची सम्यक वाणी जगाला मान्य'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 01:31 IST2019-11-23T01:30:50+5:302019-11-23T01:31:02+5:30
धम्म प्रचार आणि प्रसाराला औरंगाबाद येथून सुरुवात झाली असून, याचे साक्षीदार होण्याचा मान आम्हाला मिळाला आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा धम्मसिद्धी यांनी केले

'बुद्धांची सम्यक वाणी जगाला मान्य'
- विजय सरवदे
औरंगाबाद : तथागत गौतम बुद्धांच्या जन्माने भारतभूमी पावन झाली आहे. बुद्धांची सम्यक वाणी केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जग स्वीकारत आहे. धम्म प्रचार आणि प्रसाराला औरंगाबाद येथून सुरुवात झाली असून, याचे साक्षीदार होण्याचा मान आम्हाला मिळाला आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा धम्मसिद्धी यांनी आज येथे केले.
पल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवन परिसरातील डॉ. आंबेडकर स्टेडियमवर शुक्रवारी सायंकाळी तीनदिवसीय जागतिक धम्म परिषदेला सुरुवात झाली. स्टेडियमवर उभारण्यात आलेल्या भव्य धम्मपीठावर तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीसमोर महानायका डॉ. वरकगोडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी भदन्त सदानंद महास्थवीर होते.
सायंकाळी ५.३० वाजता स्टेडियमवर भिक्खू संघाचे आगमन झाले तेव्हा उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्हेनिच कांबळे यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. भिक्खू संघाने सामूहिक वंदना घेतली. यावेळी विविध १५ देशांतून आलेल्या भिक्खू संघाला समता सैनिक दलाकडून सलामी देण्यात आली.
याप्रसंगी या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महानायका डॉ. वरकगोडा म्हणाले, जोपर्यंत आपल्या मनातून तृष्णेचा क्षय होणार नाही, तोपर्यंत दु:ख कमी होणार नाही. आज जगाला ज्या देशाने धम्मविचार दिला. त्याच देशातून हा धम्म लुप्त होत गेला. केवळ लेणी आणि काही भग्नावशेषांमधून येथे धम्म मोठ्या प्रमाणात होता, हे सिद्ध झाले. यापुढे धम्माच्या प्रसार व प्रचार करण्याची जबाबदारी तुमची आहे. भिक्खू संघाची आहे.
चौका येथील भिक्खू ट्रेनिंग सेंटर जगातील सर्वात मोठे केंद्र ठरणार आहे. या लोकुत्तरा विहारातून हे महान कार्य होईल, असे आज दिसते. या जगाला बुद्धाच्या शिकवणीची गरज आहे. या महान कार्यासाठी, धम्म प्रशिक्षणासाठी मी आशीर्वाद देतो. डॉ. वरकगोडा यांच्या भाषणाचा मराठीतून अनुवाद आनंद महाथेरो यांनी केला. यावेळी विविध देशांतील बौद्ध भिक्खूंनी मनोगत व्यक्त केले.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
जागतिक धम्म परिषदेसाठी जगभरातून आलेल्या भिक्खू संघावर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्हेनिच कांबळे यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.
नागसेनवन परिसरातील डॉ. आंबेडकर स्टेडियमवर आयोजित जागतिक धम्म परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीलंकेचे महानायक भदंत डॉ.वरकगोडा धम्मसिध्दी, अखिल भारतीय भिक्खु संघाचे संघनुशासक भन्ते सदानंद महास्थवीर, भदंत बोधिपालो महास्थवीर यांच्यासह विविध देशातील भिक्खूसंघ.