कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन

By संतोष हिरेमठ | Published: January 30, 2024 05:57 PM2024-01-30T17:57:53+5:302024-01-30T17:58:55+5:30

आपल्या अबोल स्वभावामुळे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या विजय कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत कुंचल्याची साथ मात्र सोडली नाही. 

brush stopped! Painter Vijay Kulkarni, famous for Ajantha painting style, passed away | कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन

कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांतील चित्रे काळाच्या ओघात धूसर होऊ लागली आहेत. मात्र, ही चित्रे आपल्या चित्रकलेतून एकप्रकारे पुनरुज्जीवित करण्याचे काम चित्रकार विजय कुलकर्णी यांनी केले. अजिंठा लेणीची छायाचित्रे जगभरात पोहोचवली. त्यांचे ‘पद्मपाणी’चे चित्र जगभरात गाजले. त्यांच्या जाण्याने अजिंठा लेणीचा देवदूत हरपला, अशी भावना जिल्ह्यातील चित्रकार आणि कलावंतांनी व्यक्त केली.

प्रसिद्ध अजिंठा चित्रकार विजय विष्णुपंत कुलकर्णी (७३, रा. पैठण गेट) यांचे सोमवारी मध्यरात्री पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. म्यूरल पेंटिंग, अमूर्त चित्रशैली आणि अजिंठा चित्रांसाठी ते प्रख्यात होते. मूळचे वेरूळचे रहिवासी असलेल्या विजय कुलकर्णी यांना बालपणापासून चित्रकलेची आवड होती. सत्तरच्या दशकात त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. म्यूरल पेंटिंगमध्ये त्यांचा विशेष हातखंडा होता. सईद हैदर रझा, एस. व्ही. वासुदेव, चार्ल्स कोरिया, ज्ञानेश्वर नाडकर्णी, सारा अब्राहम आदी दिग्गजांनी कुलकर्णी यांना नावाजले. मुंबईहून छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यावर विजय कुलकर्णी यांनी १९८२ मध्ये वेरूळ येथे ‘रॉक आर्ट गॅलरी’ सुरू केली आणि अजिंठा चित्रांसाठी आयुष्य वाहून घेतले. आज जे. जे. स्कूल, ललित कला अकादमी, एअर इंडिया, मंत्रालय, विधान भवन, राष्ट्रपती भवन, परराष्ट्र मंत्रालयासह विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये विजय कुलकर्णी यांची चित्रे लक्ष वेधून घेत आहेत. भारताबाहेरही अनेक देशांत त्यांची चित्रे गेली. आपल्या अबोल स्वभावामुळे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या विजय कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत कुंचल्याची साथ मात्र सोडली नाही. कुलकर्णी यांच्यावर मंगळवारी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा, विक्रांत आणि विराज ही दोन मुले, सुना, नात आणि वहिनी असा परिवार आहे.

पद्मपाणी... जगप्रसिद्ध भित्तीचित्र
विजय कुलकर्णी यांनी काढलेले पद्मपाणी जगभरात गाजले. अजिंठा लेणीमध्ये बोधिसत्व पद्मपाणी यांचे जगप्रसिद्ध भित्तीचित्र आहे. बोधिसत्व पद्मपाणी हा अजानुबाहू, गोरा, रुंद कपाळ आणि भरदार छाती असलेला असून चेहऱ्यावर सोज्वळ भाव आहेत. डोक्यावर रत्नजडित मुकुट असून हातात निळसर पांढऱ्या रंगाचे कमल पुष्प धरलेले आहे. वस्त्रावरून त्या काळातील वस्त्रप्रावरणाची पद्धत लक्षात येते. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला एक वैशिष्ट्यपूर्ण लय प्राप्त झाल्यामुळे हा पद्मपाणी अधिकच आकर्षक आणि प्रसन्न दिसतो.

अजिंठ्याची चित्रशैली जिवंत ठेवली
विजय कुलकर्णी यांनी अजिंठ्याची चित्रकला जगविख्यात केली. चित्रांसह त्यांनी प्रतिकृतीही तयार केल्या. या कलाकृती घरादारांपर्यंत पोहोचवली. एकप्रकारे अजिंठ्याची चित्रशैली जिवंत ठेवली. अजिंठा लेणी म्हटले की विजय कुलकर्णी आणि विजय कुलकर्णी म्हटले की अजिंठा लेणी.
- मेधा पाध्ये, चित्रकार

कलाक्षेत्राची हानी
विजय कुलकर्णी म्हणजे अजिंठा लेणीचा देवदूत. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राची हानी झाली. अजिंठ्याची चित्रे त्यांनी देश-विदेशात पोहोचवली. जेवढे बारकावे त्यांनी टिपले, तेवढे कोणीही टिपले नाही. खूप मनमिळावू आणि संवेदनशील असा माणूस ते होते.
डाॅ. उदय भोईर, प्राचार्य, राजा रवि वर्मा चित्रकला महाविद्यालय

राष्ट्रपती भवन, विदेशातही पोहचल्या पेंटिंग
मुंबईहून छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यावर कुलकर्णी यांनी १९८२ मध्ये वेरूळ येथे 'रॉक आर्ट गॅलरी' सुरू केली आणि अजिंठा चित्रांसाठी आयुष्य वाहून घेतले. आज जे. जे. स्कूल, ललित कला अकादमी, एअर इंडिया, मंत्रालय, विधान भवन, राष्ट्रपती भवन, परराष्ट्र मंत्रालयासह विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये विजय कुलकर्णी यांची चित्रे लक्ष वेधून घेत आहेत. भारताबाहेरही अनेक देशांत त्यांची चित्रे गेली आहेत. आपल्या अबोल स्वभावामुळे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या विजय कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत कुंचल्याची साथ मात्र सोडली नाही. 

पुण्यातच झाले अंत्यसंस्कार
विजय कुलकर्णी यांच्यावर मंगळवारी (दि. 30) सकाळी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा, विक्रांत आणि विराज ही दोन मुले, सुना, नात आणि वहिनी असा परिवार आहे.

Web Title: brush stopped! Painter Vijay Kulkarni, famous for Ajantha painting style, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.