सहाही मतदारसंघांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
By Admin | Updated: August 4, 2014 00:53 IST2014-08-04T00:51:49+5:302014-08-04T00:53:10+5:30
सहाही मतदारसंघांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

सहाही मतदारसंघांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
लातूर : भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या रविवारी मुलाखती घेतल्या. लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या.
प्रचंड घोषणाबाजी अन् शक्तीप्रदर्शनाने शासकीय विश्रामगृहाचा परिसर रविवारी गजबजून गेला होता. समर्थक कार्यकर्त्यांचे जथ्येच्या जथ्ये शासकीय विश्रामगृहावर ठाण मांडून होते. पक्ष निरीक्षक आमदार सुधाकर देशमुख व आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी सकाळी ११.३० वाजता मुलाखतीला प्रारंभ केला. सुरुवातीला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर अहमदपूर व निलंगा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. उदगीर व लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी रात्री उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या. औसा विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घ्याव्यात, असा आग्रह किरण उटगे यांनी धरला होता. त्यांनी शक्तीप्रदर्शनही केले. (प्रतिनिधी)
लातूर शहर विधानसभा...
लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी रात्री उशिरापर्यंत मुलाखती चालल्या. शैलेश लाहोटी, सुधीर धुत्तेकर, बाबू खंदाडे, अॅड. शैलेश गोजमगुंडे, अॅड. बळवंत जाधव, अॅड. प्रदीप मोरे, देविदास काळे, डॉ. मन्मथ भातांब्रे यांनी मुलाखती दिल्या.
मतदारसंघ महिलांना सोडावेत...
सहा विधानसभा मतदारसंघापैकी किमान दोन मतदारसंघ महिलांसाठी सोडावेत, अशी मागणी निरीक्षकांकडे लता मुंडे यांनी केली.
उदगीरमध्ये सर्वाधिक इच्छुक...
उदगीर राखीव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची सर्वाधिक गर्दी होती. विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह मोहन माने, विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचे पुतणे विश्वजित गायकवाड, माजी आमदार टी.पी. कांबळे, शिवाजी सूर्यवंशी, माजी आ. रामचंद्र नावंदीकर, पांडुरंग सूर्यवंशी, शिवाजी लकवाले, रामचंद्र अदावळे, बालाजी गवारे, सरस्वती मिरगे, अंबादास अमलपुरे, दयानंद कांबळे, पांडुरंग भालेराव, नामदेव कदम, बालाजी कांबळे, मीराताई कांबळे, डॉ. अनिल कांबळे, पंडित सूर्यवंशी, बालाजी सिंदगीकर, लक्ष्मण अदावळे आदींनी मुलाखती दिल्या.
अहमदपुरातील इच्छुक... लातूर ग्रामीण...
अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप देशमुख, बालाजी पाटील चाकूरकर, गणेश हाके, अशोक केंद्रे, भारत चामे, बब्रुवान खंदाडे, रामचंद्र तिरुके, शिवाजी भिकाणे, शालिनी कराड, वसंत डिगोळे, शाम मुंजाने, राजकुमार मजगे आदींनी शक्तीप्रदर्शन करून मुलाखती दिल्या.
मुलाखतीचा प्रारंभ सकाळी ११.३० वाजता लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून झाला. सर्वप्रथम रमेश कराड यांनी मुलाखत दिली. बाबूराव खंदाडे, बालकिसन अडसूळ, जि.प.चे माजी सदस्य राजकुमार कलमे, डॉ. मन्मथ भातांब्रे यांनी मुलाखती दिल्या. उमेदवारीसाठी प्रचंड शक्तीप्रदर्शन अन् घोषणाबाजी यावेळी पहायला मिळाली.
निलंगा विधानसभेतील इच्छुक...
निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी संभाजी पाटील यांच्यासह शिवाजी बिराजदार, मिनाक्षी पाटील, डॉ. भातांब्रे यांनी मुलाखती दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी रुपाताई पाटील यांच्यासाठी पक्ष निरीक्षकांकडे आग्रह धरला.
औैसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने तो सोडून घ्यावा, अशी मागणी किरण उटगे यांनी केली. त्यांनी शक्तीप्रदर्शनासह यावेळी मुलाखत दिली.
संभाजी पाटील निलंगेकरांपुढे तगडे आव्हान...
भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेतृत्व करू पाहणाऱ्या संभाजी पाटील निलंगेकरांपुढे इच्छुकांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. जिल्हा परिषदेतील माजी उपाध्यक्ष व दीर्घकाळ जिल्हा परिषदेत राहिलेले अॅड. संभाजी पाटील यांचा एकेकाळी जि.प.त पराभव केलेले शिवाजी बिराजदारांनी भाजपाकडून मुलाखत दिली आहे. त्यांचे मोठे आव्हान संभाजी पाटील निलंगेकरांपुढे आहे. जनता दलाच्या तिकिटावर काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पराभव करून शिवाजी बिराजदार जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. आता भाजपातील तिकिटाच्या स्पर्धेतही बाजी मारतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांतून होती.