बँकेसह कारखान्याला उर्जितावस्था आणू
By Admin | Updated: April 30, 2015 00:36 IST2015-04-30T00:33:36+5:302015-04-30T00:36:30+5:30
उस्मानाबाद : जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बँक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही

बँकेसह कारखान्याला उर्जितावस्था आणू
उस्मानाबाद : जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बँक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने ही निवडणूक लादल्याचा आरोप करीत मतदारांनी काँग्रेस-सेनेला बहुमत दिल्यास जिल्हा बँकेसह तेरणा आणि तुळजाभवानी या दोन्ही कारखान्यांना संकटातून बाहेर काढू, असे प्रतिपादन भैैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी केले.
बुधवारी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, बापूराव पाटील, सुनील चव्हाण, तर शिवसेनेचे माजी आ. ओम राजेनिंबाळकर, ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनंजय सावंत आदींची उपस्थिती होती. तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या कारखान्यांचा व्यवहार ठप्प झाल्याने जिल्हा बँकही अडचणीत सापडली. बँकेला उर्जीतावस्थेत आणण्यासाठी हे दोन्ही कारखाने सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगत यासाठीच आपण बँकेत १०० कोटींची ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ही निवडणूक लढावी लागत असल्याचे सांगत राष्ट्रवादीनेच ही निवडणूक लादल्याचा आरोप सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादी ५, काँग्रेस ५ आणि सेना-भाजपा ५ जागा, असा फॉर्म्युला आम्ही सर्वपक्षिय बैठकीत ठेवला होता. मात्र, राष्ट्रवादीला आठ जागा हव्या होत्या. त्यामुळेच बँक बिनविरोध काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याचेही सावंत यांनी सांगितले. या फॉर्म्युल्याला राष्ट्रवादीचे आ. राहुल मोटे तयार होते. त्यांनी यासाठी स्वत:चा फॉर्मही काढला होता, असा दावाही सावंत यांनी या पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेनेसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. (जि. प्र.)