३५ गावांत घरकुलांवर ५२५ बिगाऱ्यांना शिकवणार गवंडी काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:06+5:302021-01-08T04:08:06+5:30
--- औरंगाबाद - ग्रामीण गृहनिर्माणात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासू नये यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण गवंडी प्रशिक्षणासाठी नऊ ...

३५ गावांत घरकुलांवर ५२५ बिगाऱ्यांना शिकवणार गवंडी काम
---
औरंगाबाद - ग्रामीण गृहनिर्माणात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासू नये यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण गवंडी प्रशिक्षणासाठी नऊ तालुक्यांमध्ये ३५ गावांत मंजूर १०५ घरकुलांच्या कामावर या परिसरातील अकुशल बिगाऱ्यांना गवंडी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून गट विकास अधिकाऱ्यांना उद्दिष्ट दिले आहे.
जिल्ह्यात महाआवास ग्रामीण योजनेला सुरुवात झाली असून ९५ टक्के लाभार्थी निवड व घरकुलांची मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०१६-१७ ते २०२०-२१ पर्यंत घरकुलांच्या विविध योजनांचे एकूण उद्दिष्ट २३ हजार २७ आहे. पुढील १०० दिवसांत हे उद्दिष्ट पूर्तीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना कामांना गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्या असून अद्यापही घरकूल बांधणीत जागेअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून ५० हजारांपर्यंत मदत मिळवता येते. तर ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्पांअंतर्गत लाभधारकांनी एकत्र येऊन जागेची मागणी केल्यास ती उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून जागा उपलब्ध करुन दिल्या जात आहे.
जिल्ह्यात माळीवाडा व पैठणजवळ अशा प्रकल्पांना जागा दिल्या असून पैठणजवळची वस्ती तयार झाली आहे. माळीवाडा येथील वस्तीचे काम सुरु होण्याच्या मार्गावर आहे. अतिक्रमण नियमानुकुलनाचाही पर्याय यासाठी लाभधारकांना दिला गेला आहे. गवंडी प्रशिक्षणात महिलांनीही पुढाकार घ्यावा असा प्रयत्नही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरु आहे.