सिल्लोड: तालुक्यातील हळदा शिवारातील एका शेतकऱ्यांच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंजुर वैयक्तिक लाभार्थी सिंचन विहिरीचे १ लाख २६ हजारांचे बिल मंजुर करण्यासाठी १२ हजारांची लाच घेतांना सिल्लोड पंचायत समितीच्या टेक्निकल असिस्टंटला लाच लुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरात अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल हजारे टेक्निकल असिस्टंट (कंत्राटी) सिल्लोड पंचायत समिती कार्यालय असे आहे.
यातील तक्रारदार यांचे हळदा शिवारातील शेत गटनं ११५ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काम सुरू आहे. त्याचे मंजुर वैयक्तिक लाभार्थी सिंचन विहिरीचे बिल १ लाख २६ हजार रुपये ऑनलाईन करुन मंजुर करण्याकरीता हजारे यांनी शेतकऱ्याला १२ हजार रुपये लाच मागितली होती. ठरल्याप्रमाणे १८ मार्च रोजी सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात त्यांनी लाच घेतली. यावेळी दबा धरून बसलेल्या लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यानी त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी केली आहे. त्यांना पोलीस हवालदार काळे, सिनकर पोलीस अंमलदार गोरे व ताठे यांनी मदत केली.